
लागोस(नायजेरिया), १० ऑगस्ट (हिं.स.) अंडर-२३ राष्ट्रकुल फेन्सिंग चॅम्पियनशिपच्या उद्घाटन दिवशी भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी करत एकूण १७ पदके जिंकली. पुरुष आणि महिलांच्या वैयक्तिक स्पर्धांमध्ये चार सुवर्ण, चार रौप्य आणि नऊ कांस्य पदके जिंकून भारताने आंतरराष्ट्रीय फेन्सिंगच्या मंचावर आतापर्यंतची सर्वात प्रभावी कामगिरी केली. ही स्पर्धा ९ ऑगस्ट रोजी सुरू झाली असून ती १४ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
भारतीय खेळाडूंनी सर्वच प्रकारांमध्ये आपली प्रभावी उपस्थिती दर्शवली. सेबर, फॉइल आणि एपि या सहा वैयक्तिक स्पर्धांपैकी प्रत्येकामध्ये किमान एका भारतीय फेन्सरने पदक जिंकले. पुरुषांच्या सेबर प्रकारात भारतीय खेळाडूंनी पदकांवर वर्चस्व गाजवले. निखिल वाघने सुवर्णपदक जिंकले, तर लक्ष्य बदसरने रौप्यपदक पटकावले.
अश्विनी आर्य आणि लैश्राम मोरंबा यांनी कांस्यपदके जिंकून भारताच्या प्रभावी निर्भेळ विजयाची नोंद केली. पुरुषांच्या फॉइल प्रकारात तेजस पाटीलने रौप्यपदक आणि हेमाश सनासमने कांस्यपदक जिंकले. इंग्लंडच्या ऑलिव्हरने या प्रकारात सुवर्णपदक पटकावले.
पुरुषांच्या इपी प्रकारात लोकेश वेमानीने रौप्यपदक जिंकले, तर शौर्य अश्विनी आणि गॉडविन अनबकेसे यांनी कांस्यपदक पटकावले. नायजेरियाच्या थॉम्पसनने सुवर्णपदक जिंकले.
भारतीय तलवारबाजांनी महिलांच्या गटात आपले वर्चस्व कायम ठेवले. महिलांच्या फॉइल प्रकारात जॉयस आशिताने सुवर्णपदक जिंकले, तर तिची भारतीय सहकारी कनागलक्ष्मीने रौप्यपदक पटकावले. महिलांच्या इपी प्रकारात प्राची लोहानने सुवर्णपदक जिंकले. निवेद्या नायर आणि अनुप्रिया यांनी कांस्यपदक पटकावले. महिलांच्या सेबर प्रकारात जेफरेलिनने सुवर्णपदक आणि अखारीने रौप्यपदक जिंकले, तर श्रेया गुप्ताने कांस्यपदक पटकावले.
भारतीय फेन्सिंग असोसिएशनचे सरचिटणीस राजीव मेहता यांनी भारतीय पथकाच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल खेळाडू, प्रशिक्षक, सहाय्यक कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, मी सर्व पदक विजेते, प्रशिक्षक, सहाय्यक कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. त्यांची अविरत मेहनत आणि योगदान भारताच्या प्रभावी कामगिरीसाठी महत्त्वपूर्ण आहे. तरुण भारतीय फेन्सर्सना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्याच्या अधिक संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना वरिष्ठ गट व प्रमुख चॅम्पियनशिपसाठी तयार करणे, हे आमचे ध्येय आहे. भविष्यासाठी एक अधिक मजबूत आणि स्पर्धात्मक संघ तयार करण्याच्या दिशेने ही कामगिरी महत्त्वाची पावले आहेत.
भारतीय फेन्सिंग असोसिएशनने तरुण प्रतिभेला सतत प्रोत्साहन देण्याच्या आणि त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. या कामगिरीमुळे, भारतीय फेन्सिंगने जागतिक स्तरावर एक मजबूत आणि प्रभावशाली संघ म्हणून आपले स्थान आणखी मजबूत केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे