
नवी दिल्ली, 12 ऑगस्ट (हिं.स.)पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने ताज्या आयसीसी कसोटी फलंदाजी क्रमवारीत पुन्हा एकदा टॉप-10 मध्ये स्थान मिळवले आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध पोर्ट ऑफ स्पेन कसोटीत पाकिस्तानने आठ गडी राखून मिळवलेल्या विजयानंतर बाबरने क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. बाबरने सामन्याच्या पहिल्या डावात ८८ धावा केल्या, तर दुसऱ्या डावात तो २४ धावांवर नाबाद राहिला. या कामगिरीमुळे त्याने पाच स्थानांची झेप घेत १० वे स्थान पटकावले आहे. सप्टेंबर २०२४ नंतर बाबरने पहिल्यांदाच टॉप-10 कसोटी फलंदाजांमध्ये पुनरागमन केले आहे. यापूर्वी तो सलग पाच वर्षे या एलिट गटात राहिला होता. डिसेंबर २०२२ मध्ये त्याने कसोटी फलंदाजी क्रमवारीत कारकिर्दीतील सर्वोत्तम दुसरे स्थान मिळवले होते.
पाकिस्तानच्या फलंदाजांमध्ये अब्दुल्ला शफीकने सर्वात मोठी झेप घेतली आहे. पुनरागमन करणाऱ्या या तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजाने वेस्ट इंडिजविरुद्ध शानदार कामगिरी केली. शफीकने पहिल्या डावात नाबाद १६० धावा केल्या आणि दुसऱ्या डावात २४ धावांवर नाबाद राहिला. या कामगिरीबद्दल त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. या प्रभावी कामगिरीचा त्याच्या क्रमवारीवर थेट परिणाम झाला. शफीक ३२ व्या स्थानावर पोहोचला आहे.
पाकिस्तानच्या विजयाचा फायदा त्यांच्या गोलंदाजांनाही झाला. ऑफ-स्पिनर साजिद खान कसोटी गोलंदाजी क्रमवारीत पाच स्थानांनी वर चढून ३० व्या स्थानावर पोहोचला आहे. दरम्यान, मोहम्मद अली आठ स्थानांनी पुढे जात ८५ व्या स्थानावर पोहोचला आहे. डावखुरा फिरकी गोलंदाज अली उस्मानने क्रमवारीत सर्वात मोठी झेप घेतली असून, तो ५८ स्थानांनी वर चढून ९७ व्या स्थानावर पोहोचला आहे. वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज शमरह जोसेफही एका स्थानाने पुढे जात १९ व्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने कसोटीत तीन बळी घेतले.
ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड कसोटी फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम आहे. दरम्यान, भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह कसोटी गोलंदाजी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे. भारतीय स्टार रवींद्र जडेजा अष्टपैलूंच्या क्रमवारीत अव्वल स्थानी कायम आहे.
अफगाणिस्तान आणि आयर्लंड यांच्यातील मालिकेनंतर, ताज्या एकदिवसीय क्रमवारीतही बदल झाले आहेत. अफगाणिस्तानचा रहमानुल्ला गुरबाज ११ व्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने मालिकेत ३२ आणि ७१ धावा केल्या. हशमतुल्ला शाहिदी देखील ५० व्या स्थानावर पोहोचला आहे.
अफगाणिस्तानचा कर्णधार रशीद खाननेही एकदिवसीय गोलंदाजी क्रमवारीत आपले स्थान अधिक मजबूत केले आहे. आयर्लंडविरुद्ध सलग दुसऱ्यांदा सामनावीर ठरलेल्या कामगिरीत त्याने सहा बळी घेतले. आयर्लंडचा मार्क अडायरही एकदिवसीय गोलंदाजी क्रमवारीत परतला असून, त्याने १७ वे स्थान पटकावले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे