
मॉस्को, 10 ऑगस्ट (हिं.स.)।रशिया आणि युक्रेनदरम्यान पुन्हा एकदा भीषण युद्ध भडकले आहे. दोन्ही देशांनी रात्रीभर एकमेकांवर जोरदार बॉम्बहल्ले केले. या हल्ल्यांमध्ये दोन्ही देशांतील अनेक नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
युक्रेनमधील शहरांवर रशिया दररोज मोठ्या प्रमाणात हल्ले करत आहे. त्यामुळे युक्रेनचे मोठे नुकसान होत आहे. युक्रेनकडे अमेरिकेची ‘पॅट्रियट’ हवाई संरक्षण प्रणाली हे प्रमुख संरक्षण साधन आहे. मात्र, या प्रणालीसाठी आवश्यक असलेल्या इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांची मोठी कमतरता असल्याने युक्रेनला रशियन क्षेपणास्त्रे रोखण्यात अडचणी येत आहेत.
दरम्यान, युक्रेननेही प्रत्युत्तरादाखल रशियावर हल्ले करून नुकसान केले आहे. युक्रेनने रशियाच्या सीमावर्ती भागांवर ड्रोन हल्ले केले. या हल्ल्यात बेलगोरोड येथे पाच जणांचा मृत्यू झाला असून सुमारे दोन डझन लोक जखमी झाले आहेत. जखमींमध्ये चार वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे.याचवेळी युक्रेनमधील खार्किव येथे एका उंच इमारतीतील अपार्टमेंट ब्लॉकवर रशियन क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला असून 13 जण जखमी झाले आहेत.
युक्रेनच्या काळ्या समुद्रातील ओडेसा बंदरावरही डझनभर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात आठ जण जखमी झाल्याची माहिती आहे.युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेंस्की गेल्या अनेक महिन्यांपासून अमेरिका आणि इतर देशांकडून ‘पॅट्रियट’ हवाई संरक्षण प्रणाली मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी ही प्रणाली अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.मात्र, अमेरिका स्वतः इराणसोबतच्या युद्धात गुंतलेला असल्याने तेथेही ‘पॅट्रियट’ प्रणालीची कमतरता निर्माण झाली आहे.
झेलेंस्की युक्रेनमध्येच ‘पॅट्रियट’ प्रणाली तयार करण्याची परवानगी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच, एलन मस्क यांच्या ‘स्टारलिंक’ उपग्रह दळणवळण प्रणालीचा वापर करून रशियातील हल्ल्यांना मार्गदर्शन करण्याची परवानगी मिळवण्याचाही त्यांचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे. या माध्यमातून रशियाच्या क्षेपणास्त्र प्रक्षेपकांना लक्ष्य करण्याचा उद्देश आहे.
युक्रेनकडून रशियातील ऊर्जा पायाभूत सुविधा, देशातील सर्वात मोठे ऑनलाइन रिटेलर ‘वाइल्डबेरीज’ तसेच इतर लक्ष्यांवर लांब पल्ल्याच्या ड्रोनद्वारे हल्ले केले जात आहेत. या हल्ल्यांमुळे रशियामध्ये इंधनाच्या संकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने रविवारी दावा केला की, रात्री झालेल्या हल्ल्यांमध्ये खार्किव परिसरातील ड्रोन साठवणूक केंद्रे, ओडेसा बंदरातील युक्रेनियन लष्कराचे इंधन डेपो आणि इतर साहित्याचे साठे यांना लक्ष्य करण्यात आले. रशियाने रात्रीच्या वेळी युक्रेनचे 153 ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे.
रशियाच्या बेलगोरोड भागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यांमध्ये 29 अपार्टमेंट इमारती आणि पाच खासगी घरांचे नुकसान झाले आहे. याशिवाय प्रशासकीय इमारती तसेच काही अज्ञात ‘व्यावसायिक ठिकाणांनाही’ हानी पोहोचली आहे.
महापौर आंद्रे क्रावचेंको यांनी सांगितले की, युक्रेनच्या ड्रोनचे अवशेष रशियातील नोवोरोस्सिय्स्क शहरातील दोन कंपन्यांच्या परिसरात आणि एका खासगी घरावरही पडले.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ड्रोनचे अवशेष कोसळल्याने एक व्यक्ती जखमी झाली. दोन खासगी घरांचे नुकसान झाले असून एका अपार्टमेंट इमारतीच्या खिडकीचेही नुकसान झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode