
नाशिक, 10 ऑगस्ट (हिं.स.): नाशिकच्या पर्यटनाला टवाळखोरांची नजर लागल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. हरिहर किल्ल्यावरून परतणाऱ्या पर्यटकांच्या वाहनाला मोटारसायकलला कट मारल्याच्या कारणावरून अडवून मारहाण, शिवीगाळ आणि दगडफेक केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या हल्ल्यात वाहनाचे मोठे नुकसान झाले असून पर्यटकांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे त्र्यंबकेश्वर-घोटी पर्यटन मार्गावरील पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तासाभरात चार आरोपींना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांत दाखल झालेल्या तक्रारीनुसार, पर्यटक हरिहर किल्ल्यावरून वाहनाने परतत असताना मोटारसायकलला कट मारल्याच्या कारणावरून त्यांचा दुचाकीस्वारांशी वाद झाला. या वादानंतर संबंधितांनी मोटारसायकलवरून पर्यटकांच्या वाहनाचा पाठलाग केल्याचा आरोप आहे. काही अंतरापर्यंत पाठलाग केल्यानंतर वावी हर्ष परिसरात पर्यटकांची गाडी अडवण्यात आली. यावेळी आरोपींनी वाहनचालक आणि प्रवाशांना शिवीगाळ करत मारहाण केली. चालक आणि प्रवाशांना काठी तसेच चापटीने मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
मारहाणीनंतर आरोपींनी पर्यटकांच्या वाहनावर दगडफेक केल्याचाही आरोप आहे. या दगडफेकीत गाडीच्या समोरील काचेचे तसेच साईड मिररचे नुकसान झाले. वाहनाचे छत आणि बंपरही काठी व दगडांनी फोडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.हल्ल्यादरम्यान आरोपींनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकारामुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
१० जणांविरुद्ध गुन्हा; चौघे ताब्यात
हरिहर किल्ल्यावरून परतणाऱ्या पर्यटकांसोबतच हा प्रकार घडल्याने त्र्यंबकेश्वर-घोटी पर्यटन मार्गावरील सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या प्रकरणी १० जणांविरुद्ध घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत तासाभरात चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून, त्यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI