
दमास्कस, 11 ऑगस्ट (हिं.स.)। सीरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांना दमास्कस येथील एका फौजदारी न्यायालयाने युद्धगुन्हे आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांच्या आरोपांमध्ये दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली आहे.
सीरियात तब्बल 14 वर्षे सुरू असलेल्या संघर्षात सुमारे पाच लाख लोकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात सीरियाच्या लष्करातील माजी अधिकारी आणि असद यांचे धाकटे बंधू माहेर अल-असद यांनाही फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.याच प्रकरणात असद यांचे मामेभाऊ आतिफ नजीब यांनाही फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नजीब हे सीरियाच्या लष्करातील माजी ब्रिगेडियर जनरल होते. 2011 मध्ये असद यांच्या राजवटीत दक्षिण सीरियातील दारा प्रांतातील राजकीय सुरक्षा शाखेचे ते प्रमुख होते.दारा प्रांतात त्यांनी केलेल्या कारवाईमुळेच तेथे उठाव झाला आणि त्यानंतर गृहयुद्धाला सुरुवात झाली, असा त्यांच्यावर आरोप होता.
न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार, नजीब यांनी 15 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांची जाणूनबुजून हत्या केली आणि मृत्यू होईल इतकी गंभीर यातना दिली. न्यायालयाने त्यांची कृत्ये मानवतेविरुद्धचे गुन्हे असल्याचे नमूद केले आणि त्यांना सर्वात कठोर शिक्षा म्हणजेच फाशीची शिक्षा सुनावली. डिसेंबर 2024 मध्ये बंडखोर शक्तींनी दमास्कसला वेढा घातल्यानंतर बशर अल-असद आपल्या कुटुंबासह मॉस्कोला पळून गेले होते. मात्र, नजीब सीरियातच राहिले. त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर खटला चालवण्यात आला. खटल्याला सामोरे जाणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी नजीब हे एक प्रमुख अधिकारी ठरले.
सीरियावर 50 वर्षांहून अधिक काळ हाफेझ अल-असद आणि त्यानंतर त्यांचे पुत्र बशर अल-असद यांनी राज्य केले. अरब स्प्रिंगच्या काळात 2011 मध्ये सुमारे 2.3 कोटी लोकसंख्या असलेल्या सीरियात त्यांच्या राजवटीविरोधात उठावाला सुरुवात झाली.सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राइट्सच्या माहितीनुसार, या उठावाचे रूपांतर 13 वर्षे चाललेल्या गृहयुद्धात झाले. या संघर्षात पाच लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला.
गृहयुद्धाच्या काळात लाखो नागरिकांनी लेबनॉन, जॉर्डन, तुर्किये आणि युरोपातील विविध देशांमध्ये आश्रय घेतला. सत्तेत टिकून राहण्यासाठी असद कुटुंबाने सांप्रदायिक तणावाचा फायदा घेतल्याचा आरोप करण्यात आला.बशर अल-असद यांच्या राजवटीचा वारसा आजही सीरियातील अल्पसंख्याक समुदायांविरोधातील हिंसाचाराला खतपाणी घालत असल्याचे सांगितले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode