
भरोसा सेलची धडक कारवाई; तरुणीची सुटका, दोन ग्राहकांसह महिला ताब्यात
अमरावती, ११ ऑगस्ट (हिं.स.) : शहर पोलीस आयुक्तालयाच्या भरोसा सेलच्या महिला पथकाने सोमवारी दुपारी राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टीटीनगर परिसरातील एका अपार्टमेंटमधील फ्लॅटवर छापा टाकून सुरू असलेल्या कुंटणखान्याचा पर्दाफाश केला. या कारवाईत नागपूर येथील एका पीडित तरुणीची देहविक्रीच्या व्यवसायातून सुटका करण्यात आली. तसेच दोन ग्राहकांसह हा व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले.
भरोसा सेलच्या प्रमुख पोलीस निरीक्षक ज्योती विल्हेकर यांना टीटीनगर परिसरातील एका फ्लॅटमध्ये नागपूरहून तरुणींना बोलावून अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. माहितीची खात्री करण्यासाठी पोलिसांनी आधी बनावट ग्राहक तयार करून त्याला संबंधित फ्लॅटवर पाठविले. पंटरकडून खात्री पटल्याचा इशारा मिळताच दबा धरून बसलेल्या पोलिस पथकाने फ्लॅटवर अचानक धाड टाकली.
या कारवाईदरम्यान फ्लॅटमध्ये दोन तरुण ग्राहकही आढळून आले. पोलिसांनी संबंधित महिलेसह दोन्ही ग्राहकांना ताब्यात घेतले असून, पीडित तरुणीची सुटका केली आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, ताब्यात घेण्यात आलेली महिला मागील चार वर्षांपासून याच फ्लॅटमध्ये हा अवैध व्यवसाय चालवत होती.
सुटका करण्यात आलेली तरुणी नागपूर येथील रहिवासी असून, ती नागपूर ते अमरावती असा नियमित प्रवास करून या व्यवसायात सहभागी होत असल्याचे तपासात समोर आले आहे.
या कारवाईत पोलीस निरीक्षक ज्योती विल्हेकर, सहायक पोलीस निरीक्षक मेघाली गावंडे यांच्यासह भरोसा सेलच्या महिला अंमलदारांनी सहभाग घेतला.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींचे मोबाइल फोन पोलिसांनी जप्त केले आहेत. या मोबाइलमधील माहितीच्या आधारे या प्रकरणातील अन्य व्यक्ती आणि संभाव्य कनेक्शन समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे तपासाला आणखी दिशा मिळण्याची शक्यता आहे.
याप्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यात पिटा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास राजापेठ पोलिसांकडे सोपविण्यात आला आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी