
जळगाव, 11 ऑगस्ट, (हिं.स.) - शनीपेठ पोलिसांनी जळगाव शहरातील स्मशानभूमीजवळील उमेश बिअर शॉपी परिसरातून एका इसमाला देशी बनावटीच्या पिस्तूलासह ताब्यात घेतले. प्रकाश तोलार (रा. खेडी, ता. जळगाव, हल्ली रा. साई सिटी, जळगाव) असं अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव असून त्याच्याकडून दोन जिवंत काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांची माहिती मिळवून त्यांच्यावर प्रभावी कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार शनीपेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विशाल जयस्वाल यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले होते.
शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्मशानभूमीजवळील उमेश बिअर शॉपी परिसरात एक इसम अवैध अग्निशस्त्र घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची पडताळणी केल्यानंतर पोलिसांचे पथक तातडीने संबंधित ठिकाणी रवाना झाले. तेथे प्रकाश तोलार याला ताब्यात घेण्यात आले.पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला आहे.या प्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर