
बीड, 11 ऑगस्ट (हिं.स.)। चारित्र्यावर संशय घेऊन सतत होणाऱ्या कौटुंबिक त्रासातून पतीने स्वतःच्या अंगणवाडी कार्यकर्त्या असलेल्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पिंपळनेर परिसरात घडली आहे. या गंभीर घटनेत महिला तीव्र भाजली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पीडित महिला अनुष्का मिलींद शिरसट (वय ३७, राहणार पिंपळनेर, तालुका बीड) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा पती मिलींद राजभाऊ शिरसट (वय ३८, राहणार पिंपळनेर) हा त्यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन सतत मारहाण व अपशब्द वापरून मानसिक छळ करत असे. अंगणवाडीतून घरी येण्यास उशीर झाल्यास तो अश्लील भाषेत शिवीगाळ करत असे. याच वादातून पतीने रागाच्या भरात अनुष्का यांच्या अंगावर पेट्रोल ओतले आणि काडी ओढून त्यांना पेटवून दिले. महिलेने मारलेल्या आक्रोशाने सासू, सासरे आणि नातेवाईकांनी धाव घेत आग विझवली आणि त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. घटनेनंतर आरोपी पती घटनास्थळावरून पसार झाला.
याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात आरोपी पती मिलींद शिरसट याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेशी संबंधित कलमांन्वये खुनाचा प्रयत्न, मारहाण, अपशब्द वापरणे आणि कौटुंबिक छळाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप थोरात करत असून फरार आरोपीचा शोध घेतला जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis