इराणने अमेरिकेला नुकसानभरपाई द्यावी- ट्रम्प
वॉशिंग्टन, 11 ऑगस्ट (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एकीकडे स्ट्रेट ऑफ होर्मुझवर आता केवळ अमेरिकन नौदलाचे नियंत्रण असल्याचा दावा केला आहे, तर दुसरीकडे इराणसोबतच्या युद्धादरम्यान झालेल्या नुकसानीची भरपाई मागितली आहे. ट्रम्प यां
इराणने अमेरिकेला नुकसानभरपाई द्यावी- ट्रम्प


वॉशिंग्टन, 11 ऑगस्ट (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एकीकडे स्ट्रेट ऑफ होर्मुझवर आता केवळ अमेरिकन नौदलाचे नियंत्रण असल्याचा दावा केला आहे, तर दुसरीकडे इराणसोबतच्या युद्धादरम्यान झालेल्या नुकसानीची भरपाई मागितली आहे. ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवरील एका पोस्टद्वारे ही नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

स्ट्रेट ऑफ होर्मुझबाबत बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, या जलमार्गावर आता केवळ अमेरिकन नौदलाचे नियंत्रण आहे आणि या भागातील अमेरिकेची नाकेबंदी पूर्णपणे मजबूत आहे. त्यांनी या नाकेबंदीची तुलना ‘पोलादी भिंती’शी केली असून, अमेरिकेला ज्या जहाजांना या भागातून जाण्याची परवानगी द्यायची आहे, त्यांनाच मार्ग दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. “स्ट्रेट ऑफ होर्मुझवर आमचे १०० टक्के नियंत्रण आहे,” असा दावा ट्रम्प यांनी केला.ट्रम्प यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे, जेव्हा होर्मुझमधील जहाजांच्या वाहतुकीवरून अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव सातत्याने चर्चेत आहे. दोन्ही देशांकडून या मुद्द्यावर विविध दावे आणि वक्तव्ये केली जात आहेत. मात्र, अद्याप कोणत्याही ठोस करारावर सहमती झालेली नाही.

दरम्यान, ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की, इराणला कोणतीही नुकसानभरपाई दिली जाणार नाही. उलट, या युद्धात अमेरिकेचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी इराणने अमेरिकेला नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवरील पोस्टमध्ये ही भूमिका मांडली.ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे प्रतिनिधी गेल्या पाच महिन्यांतील लष्करी संघर्षादरम्यान झालेल्या नुकसानीची भरपाई मागत असल्याचे ते पाहत आहेत. त्यांच्या मते, इराणकडे अण्वस्त्रे राहू नयेत, या कारणामुळे हा संघर्ष सुरू झाला होता. मात्र, अमेरिका आणि इराणमधील कोणत्याही चर्चेत किंवा बैठकीत नुकसानभरपाईच्या मुद्द्याचा उल्लेख झालेला नव्हता.

ट्रम्प यांनी पुढे म्हटले की, “ही एक मनोरंजक कल्पना आहे. कारण आता मीही इराणकडून नुकसानभरपाईची मागणी करत आहे. इराणच्या रस्त्याच्या कडेला केलेल्या बॉम्बस्फोटांमध्ये आणि विविध संघर्षांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या तसेच गंभीर जखमी झालेल्या लोकांसाठी ही भरपाई मागितली जात आहे. या घटनांसाठी इराण कुप्रसिद्ध आहे. जनरल सुलेमानीपासून सुरू झालेल्या या घटनांमध्ये यूएसएस कोलवरील हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांचाही समावेश आहे. तसेच संघर्षांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या हजारो इतर लोकांच्या कुटुंबीयांनाही नुकसानभरपाई मिळायला हवी.”

गेल्या ५० वर्षांत इराणने केलेल्या कारवायांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या लाखो निष्पाप आंदोलकांच्या कुटुंबीयांनाही नुकसानभरपाई मिळायला हवी, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. तसेच गेल्या पाच महिन्यांत मृत्युमुखी पडलेल्या ५२ हजार लोकांचाही त्यांनी उल्लेख केला.या मुद्द्याचा भविष्यातील कोणत्याही चर्चेत ठामपणे पाठपुरावा करण्याचे निर्देश आपण आपल्या प्रतिनिधींना दिले आहेत, असेही ट्रम्प यांनी सांगितले.

दरम्यान, स्ट्रेट ऑफ होर्मुझ पुन्हा खुला करण्यासाठी इराणने अमेरिकेकडे अब्जावधी डॉलरच्या आर्थिक मदतीची मागणी केली आहे. तसेच अमेरिकेने नौदलाची नाकेबंदी समाप्त करावी, या भागातून अमेरिकन सैनिकांना माघारी बोलवावे आणि इतरही काही सवलती द्याव्यात, अशी मागणी इराणने केल्याचे समोर आले आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुझ हा जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल आणि नैसर्गिक वायू वाहतुकीच्या मार्गांपैकी एक आहे. इराणकडून क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ल्यांचा धोका असल्यामुळे या भागातील सागरी वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे जागतिक तेल बाजारातील अस्थिरताही वाढली आहे. यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार, इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुझमधील सागरी वाहतूक पूर्णपणे पूर्ववत केली, तर अणुकराराशिवायही संघर्ष समाप्त करण्याचा मार्ग अमेरिका शोधू शकते, असे ट्रम्प यांनी आपल्या निकटवर्तीय अधिकाऱ्यांना संकेत दिले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande