
बोगोटा, 11 ऑगस्ट (हिं.स.)।कोलंबियामध्ये सोमवारी झालेल्या 7.4 तीव्रतेच्या भीषण भूकंपाने मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत किमान 132 जणांचा मृत्यू झाला असून 570 हून अधिक जण जखमी झाले आहेत. भूकंपाचा सर्वाधिक फटका परेरा शहराला बसला असून येथे 60 जणांचा मृत्यू झाला आहे.
भूकंपाचा केंद्रबिंदू कोलंबियातील चोको प्रांतात, सॅन होसे डेल पालमारजवळ जमिनीखाली सुमारे 170 किलोमीटर खोलीवर होता. भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की राजधानी बोगोटासह देशातील अनेक भागांतील इमारती हादरल्या आणि नागरिकांनी घाबरून तातडीने रस्त्यावर धाव घेतली. भूकंपानंतर एका बाजूला आपत्ती व्यवस्थापन पथके मदत आणि बचावकार्यात दाखल झाली, तर दुसऱ्या बाजूला डिजिटल डेटाबेसमध्ये बेपत्ता नागरिकांची नोंद सुरू झाल्याने परिस्थितीचे गांभीर्य आणखी वाढले आहे. आतापर्यंत 2 हजारांहून अधिक बेपत्ता नागरिकांची यादी तयार करण्यात आली असून, यातील बहुतांश प्रकरणे काली आणि परेरा शहरांशी संबंधित आहेत.
राष्ट्राध्यक्ष अबेलार्डो डी ला एस्प्रिएला यांच्या माहितीनुसार, 1,577 हून अधिक निवासी इमारतींचे नुकसान झाले आहे, तर 37 इमारती पूर्णपणे जमीनदोस्त झाल्या आहेत. याशिवाय 60 हून अधिक इतर इमारती, 18 आरोग्य केंद्रे आणि 52 शाळांनाही भूकंपाचा फटका बसला आहे. काली शहरातील युनिव्हर्सिटी हॉस्पिटलचेही भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. रुग्णालय प्रशासनाच्या माहितीनुसार, रुग्णालयाचा सुमारे 30 टक्के भाग कोसळला आहे. यामध्ये बालरोग विभाग, अंतर्गत औषध विभाग आणि नवजात शिशू विभागाचा समावेश आहे. ढिगाऱ्याखाली अनेक रुग्ण अडकले असण्याची शक्यता असून, त्यांना बाहेर काढण्यासाठी लष्कर आणि अग्निशमन दलाकडून सातत्याने बचावकार्य सुरू आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव काली शहरातील इतर अनेक आरोग्य केंद्रेही रिकामी करण्यात आली आहेत. तसेच पायाभूत सुविधांची तपासणी आणि सुरक्षेच्या दृष्टीने पश्चिम कोलंबियातील हवाई वाहतूक व्यवस्था तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. परेरा, मनिझालेस, आर्मेनिया, कार्टागो आणि बुएनाव्हेन्टुरा यांसारख्या प्रमुख विमानतळांवरून केवळ आपत्कालीन, वैद्यकीय आणि सरकारी विमानांनाच उड्डाणाची परवानगी देण्यात आली आहे.
कोलंबियन जिओलॉजिकल सर्व्हिसने सोमवारी रात्री उशिरापर्यंत भूकंपानंतरचे 21 धक्के म्हणजेच आफ्टरशॉक्स नोंदवले आहेत. तसेच आगामी काळात आणखी भूकंपाचे धक्के जाणवण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे.दरम्यान, कोलंबियातील या संकटाच्या काळात अनेक देशांनी मदतीचा हात पुढे केला आहे. अन्न, निवारा आणि नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी अमेरिकेने 1.55 कोटी डॉलर (15.5 दशलक्ष डॉलर) मदत देण्याची घोषणा केली आहे.सध्या भूकंपग्रस्त भागांमध्ये शोध आणि बचाव मोहीम वेगाने सुरू असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बचाव पथकांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode