इराणच्या लष्करी नेतृत्वात मोठा फेरबदल; मोजतबा खामेनेईंकडून सहा वरिष्ठ कमांडरांची नियुक्ती
तेहरान , 11 ऑगस्ट (हिं.स.)।इस्रायली माध्यमांनी इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांची प्रकृती गंभीर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचा दावा केला होता. इतकेच नव्हे, तर त्यांचा लवकरच मृत्यू होऊ शकतो, असेही या वृत्तांमध्ये म्हटले होते. मा
इराणच्या लष्करी नेतृत्वात मोठा फेरबदल; मोजतबा खामेनेईंकडून सहा वरिष्ठ कमांडरांची नियुक्ती


तेहरान , 11 ऑगस्ट (हिं.स.)।इस्रायली माध्यमांनी इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांची प्रकृती गंभीर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचा दावा केला होता. इतकेच नव्हे, तर त्यांचा लवकरच मृत्यू होऊ शकतो, असेही या वृत्तांमध्ये म्हटले होते. मात्र, आता इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांनी मोठी घोषणा करत देशाच्या लष्करी नेतृत्वात मोठे फेरबदल करण्याचे आदेश दिले आहेत.या फेरबदलांत इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी), नियमित सशस्त्र दल आणि बासिज मिलिशियामधील महत्त्वाच्या पदांवर सहा वरिष्ठ कमांडरांची नियुक्ती करण्यात आली आहे.

इराणमधील या महत्त्वाच्या नियुक्त्यांपैकी मेजर जनरल अहमद वाहिदी यांची देशातील सर्वात शक्तिशाली लष्करी आणि सुरक्षा संघटना असलेल्या आयआरजीसीच्या कमांडर-इन-चीफपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वाहिदी हे रिव्होल्युशनरी गार्ड्समधील अनुभवी अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी आयआरजीसीच्या परदेशातील कारवायांची जबाबदारी असलेल्या कुद्स फोर्सचे नेतृत्व केले आहे. त्यांची ही पदोन्नती महत्त्वाची मानली जात आहे, कारण युद्धकाळातील इराणच्या सुरक्षा आणि धोरणात्मक निर्णयांमध्ये त्यांचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे.

मेजर जनरल अली अब्दुल्लाही यांची इराणच्या सशस्त्र दलांच्या चीफ ऑफ स्टाफपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी अब्दुल्लाही हे खातम अल-अंबिया सेंट्रल हेडक्वार्टरचे प्रमुख होते. हे कमांड स्ट्रक्चर आयआरजीसी आणि नियमित लष्करासह इराणच्या विविध लष्करी शाखांमधील कारवायांमध्ये समन्वय साधण्याचे काम करते. या नियुक्त्यांमध्ये कार्यकारी पातळीवरही बदल करण्यात आले आहेत. रिअर अॅडमिरल अली अझमाई यांची आयआरजीसीच्या नौदलाच्या कमांडरपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

रिव्होल्युशनरी गार्ड्सशी दीर्घकाळापासून संबंधित असलेले प्रभावशाली गुप्तचर आणि सुरक्षा अधिकारी हुसेन ताएब यांची बासिज संघटनेच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.किउमर्स हैदरी आणि मुस्तफा इजादी यांनाही लष्कर आणि आयआरजीसीच्या कमांड संरचनेत वरिष्ठ उपप्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

इराणच्या लष्करी नेतृत्वातील हा फेरबदल केवळ नियमित प्रशासकीय बदल म्हणून पाहता येणार नाही. नव्या सर्वोच्च नेतृत्वाकडून लष्करी कमांड अधिक मजबूत करण्याचा आणि अनुभवी तसेच कट्टरपंथी कमांडरांना अशा महत्त्वाच्या पदांवर नियुक्त करण्याचा हा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. भविष्यात कोणत्याही तणावपूर्ण परिस्थितीत या अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते.

आयआरजीसी आधीपासूनच इराणच्या धोरणात्मक निर्णयप्रक्रियेतील एक प्रभावशाली शक्ती म्हणून समोर आले आहे. यावर्षीच्या सुरुवातीला करण्यात आलेल्या आकलनानुसार, वाहिदी आणि त्यांच्या निकटवर्तीय कमांडरांचा इराणच्या लष्करी प्रत्युत्तराच्या निर्णयांवर तसेच चर्चेबाबतच्या भूमिकेवर मोठा प्रभाव निर्माण झाला होता. विशेषतः होर्मुझच्या सामुद्रधुनीभोवती निर्माण झालेल्या तणावाच्या काळात हा प्रभाव अधिक स्पष्टपणे दिसून आला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande