
पुणे, 11 ऑगस्ट (हिं.स.)। आमिष, फसवणूक किंवा अन्य प्रलोभनांच्या माध्यमातून होणारे धर्मांतर रोखण्यासाठी राज्यात लागू करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य’ कायद्यानुसार पुण्यात पहिला गुन्हा दाखल झाला आहे. खडक पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, ब्रिटनमधून पुण्यात आलेल्या एका धार्मिक नेत्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
गुरुवार पेठ परिसरातील एका चर्चमध्ये संबंधित धार्मिक नेत्याचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते. या प्रवचनाच्या माध्यमातून धर्मांतराचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप काही हिंदुत्ववादी संघटनांनी केला. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आणि संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. संबंधित आरोपी ब्रिटिश नागरिक असल्याची माहिती आहे.
दरम्यान, राज्यातील बेकायदेशीर धर्मांतराच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक मंजूर करण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर त्याचे कायद्यात रूपांतर झाले आहे.
कायद्यात अल्पवयीन तसेच अनुसूचित जाती-जमातीतील व्यक्तीचे धर्मांतर झाल्यास अधिक कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आरोपीने पुन्हा धर्मांतरासंदर्भातील गुन्हा केल्यास १० वर्षांपर्यंत कारावास आणि पाच लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे.
विवाहाच्या उद्देशाने धर्मांतर करणेही या कायद्यानुसार बेकायदेशीर ठरणार आहे. मात्र, अशा विवाहातून जन्मलेल्या मुलांना कायद्यात संरक्षण देण्यात आले आहे. मुलाच्या आईचा विवाहापूर्वीचा धर्म ग्राह्य धरला जाणार असून, आई-वडिलांच्या मालमत्तेवर मुलाला पूर्ण अधिकार मिळणार आहे.
दरम्यान, एखाद्या व्यक्तीला स्वेच्छेने धर्मांतर करायचे असल्यास त्यासाठी धर्मांतराच्या किमान ६० दिवस आधी जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांना सूचना देणे बंधनकारक करण्यात आले आहे. धर्मांतराची प्रक्रिया कायद्यातील निर्धारित तरतुदींनुसारच पार पाडावी लागणार आहे.
पुण्यात या कायद्यानुसार दाखल झालेल्या पहिल्या गुन्ह्यामुळे कायद्याच्या अंमलबजावणीबाबत चर्चा सुरू झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु