सोलापुरात बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांचा पर्दाफाश; ८ जणांची नावे समोर, १७ प्रमाणपत्रे संशयाच्या भोवऱ्यात
सोलापूर, 11 ऑगस्ट (हिं.स.)। सोलापूरच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार रुग्णालयातून बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे वितरित केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आतापर्यंत आठ जणांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे काढल्याचे समोर आले असून, आणखी १७ प्रमा
सोलापुरात बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांचा पर्दाफाश; ८ जणांची नावे समोर, १७ प्रमाणपत्रे संशयाच्या भोवऱ्यात


सोलापूर, 11 ऑगस्ट (हिं.स.)। सोलापूरच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार रुग्णालयातून बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे वितरित केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आतापर्यंत आठ जणांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे काढल्याचे समोर आले असून, आणखी १७ प्रमाणपत्रे संशयास्पद आढळली आहेत. संबंधित व्यक्तींची मूळ कागदपत्रे तपासली जात आहेत. वैद्यकीय तपासणी न करताच प्रमाणपत्रे देण्यात आल्याचा संशय असून, सोलापूर शहर गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

गेल्या दीड वर्षांत सोलापूरच्या शासकीय सर्वोपचार रुग्णालयातून तब्बल ३ हजार ७१४ दिव्यांग प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली आहेत. याच कालावधीत संशयित आरोपी कनाके हा रुग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होता.बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांचा शोध घेण्यासाठी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर यांनी त्रिस्तरीय समितीची स्थापना केली आहे. या समितीच्या तपासणीत आणखी चार प्रमाणपत्रे संशयास्पद आढळली असून, त्याबाबतची माहिती सोमवारी (१० ऑगस्ट) शहर गुन्हे शाखेला देण्यात आली आहे.

दरम्यान, अटकेत असलेल्या संशयितांनी परजिल्ह्यातील आणखी १३ व्यक्तींना सोलापूरच्या ‘सिव्हिल’ रुग्णालयातून बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे मिळवून दिल्याचा संशय पोलिसांना आहे. या पार्श्वभूमीवर तपास अधिकाऱ्यांनी त्रिस्तरीय समितीकडे या १३ व्यक्तींची कागदपत्रे मागविली आहेत.

आतापर्यंतच्या तपासात दिव्यांग नसतानाही २५ जणांना दिव्यांग प्रमाणपत्रे देण्यात आल्याचे समोर आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यामुळे गेल्या दीड वर्षात वितरित झालेल्या प्रमाणपत्रांची तपासणी अधिक व्यापक होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या नेतृत्वाखालील पथक करीत आहे. संशयितांकडून आणखी किती बनावट प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली आहेत, तसेच या प्रकारात अन्य व्यक्तींचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande