
बीजिंग, 11 ऑगस्ट (हिं.स.)।चीनच्या मध्य भागातील हुबेई प्रांतात भीषण समुद्री वादळ ‘डॉल्फिन’चा प्रभाव अधिक तीव्र होत आहे. मंगळवारी हे वादळ अंतर्गत भागात पोहोचताच प्रशासनाने अनेक पर्यटनस्थळे बंद केली असून बांधकामाची कामेही थांबवली आहेत. हवामान तज्ज्ञांनी प्रांताच्या उत्तर-पश्चिमेकडील डोंगराळ भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
‘डॉल्फिन’ हे यावर्षी चीनमध्ये आलेले सर्वात शक्तिशाली वादळ असल्याचे सांगितले जात आहे. समुद्रातून सुमारे ३,७२८ मैल (६,००० किलोमीटर) प्रवास केल्यानंतर या वादळाने आठवड्याच्या अखेरीस चीनच्या पूर्व किनारपट्टीवर धडक दिली होती. सोबत मोठ्या प्रमाणात ढगांचा पट्टा घेऊन आलेल्या या वादळामुळे किनारपट्टीच्या भागात मुसळधार पाऊस झाला असून अनेक भाग जलमय झाले आहेत.सुमारे ५.८ कोटी लोकसंख्या असलेला हुबेई प्रांत हा मोटारी आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या उत्पादनाचे मोठे केंद्र आहे. अलीकडेच येथे ‘मायसक’ वादळानंतर दोन दुर्मीळ टोर्नेडो आले होते. त्यामध्ये किमान ११ जणांचा मृत्यू झाला होता.
राष्ट्रीय हवामान केंद्राने अतिमुसळधार पावसाच्या धोक्याचा इशारा देणारा दुसऱ्या क्रमांकाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. हुबेईच्या उत्तर-पश्चिम भागात पुढील २४ तासांत तब्बल २५० मिमीपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. पूर आणि भूस्खलनाचा धोका लक्षात घेता शियांगयांग, हुआंगगांग आणि सुइझोऊ यांसारख्या शहरांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. इचांग येथील प्रसिद्ध ‘थ्री गॉर्जेस धरणा’सह अनेक पर्यटनस्थळे तात्पुरती बंद करण्यात आली आहेत.याशिवाय, या भागात सुरू असलेल्या १०७ प्रमुख महामार्ग आणि जलमार्ग बांधकाम प्रकल्पांपैकी जोखमीच्या २६ प्रकल्पांचे कामही थांबवण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते, वादळाचे वारे हुबेईच्या पश्चिमेकडील पर्वतीय भागाला धडकतील, तेव्हा पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. शेजारील हेनान प्रांतात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने तेथे ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.हुबेईपासून सुमारे १,००० किलोमीटर अंतरावर असलेल्या चीनची राजधानी बीजिंगमध्येही या वादळाचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. शहराच्या चार बाहेरील भागांमध्ये ‘लेव्हल-१’ आपत्कालीन स्थिती लागू करण्यात आली आहे. मंगळवारी रात्रीपासून पुढील २४ तासांत बीजिंगमध्ये संपूर्ण वर्षभरात होणाऱ्या पावसाच्या एक-तृतीयांशपेक्षाही अधिक पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
जपानच्या हवामान विज्ञान संस्थेने ‘चान-होम’ या वादळाबाबत इशारा दिला आहे. हे वादळ मंगळवारी जपानच्या मुख्य भूभागाच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशातील काही भागांमध्ये भूस्खलन आणि वेगवान वाऱ्यांचा धोका निर्माण झाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode