
कोलकाता, 11 ऑगस्ट (हिं.स.)भारताचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष, सौरव गांगुली आणि त्यांच्या पत्नी डोना गांगुली यांना एक धमकीचे पत्र मिळाले आहे. गांगुली कुटुंब आणि त्यांच्या वैयक्तिक सहाय्यकाने दाखल केलेल्या पोलीस तक्रारीनुसार, सोमवारी सौरव गांगुली यांच्या कार्यालयात हे पत्र उघडण्यात आले. संपूर्णपणे इंग्रजीमध्ये लिहिलेल्या या पत्रात, क्रिकेटपटू आणि त्यांच्या कुटुंबाला 'उद्ध्वस्त' करण्याची धमकी देण्यात आली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून अशी पत्रे मिळत आहेत.
ही घटना अलीकडची नाही.तर गेल्या सहा महिन्यांपासून सौरवला त्याच्या घरच्या पत्त्यावर धमकीची पत्रे येत होती. या पत्रांमधील भाषा अत्यंत असभ्य होती. सुरुवातीला, माजी कर्णधाराने हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही, पण सततच्या धमक्या आणि त्याच्या पत्नीच्या हस्तक्षेपानंतर, कुटुंबाने पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. सोमवारी, दक्षिण कोलकाता येथील ठाकूरपूरकर पोलीस ठाण्यात या प्रकरणाची माहिती देण्यात आली, जिथे तक्रार नोंदवून तपास सुरू करण्यात आला.
राज्य सरकारच्या सुरक्षा विभागालाही याची माहिती देण्यात आली असून तातडीने कारवाई करण्यास सांगितले आहे. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, ही पत्रे गांगुलीच्या घरी कुरिअरमार्फत पाठवण्यात आली होती. पत्रांवर एक क्रमांक आणि पत्ता असल्याचेही आढळून आले आहे. ट्रू-कॉलरनुसार, हा क्रमांक अरुण नावाच्या व्यक्तीचा असून, पत्ता परगणा जिल्ह्यातील बेलघोरिया नॉर्थ २४ असा आहे. पत्रांमधील भाषेची चौकशी करून पाठवणाऱ्याची ओळख निश्चित करण्याचा प्रयत्न करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांनी सिम कार्डची तपासणी सुरू केली असून, पत्रे पाठवणाऱ्या कुरिअर एजन्सीशी संपर्क साधला आहे. ही सर्व पत्रे एकाच व्यक्तीने पाठवली आहेत का, याचाही पोलीस तपास करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे