
क्वेटा, 12 ऑगस्ट (हिं.स.)।पाकिस्तानमध्ये बलुचांनी उघड बंड पुकारले आहे. बलुचांनी बलुचिस्तानला स्वतंत्र राष्ट्र घोषित केले असून, आता बलुचिस्तानला पाकिस्तानचा भाग मानू नये, असे आवाहन जगभरातील देशांना केले आहे. ‘रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान’ कडे स्वतंत्र देश म्हणून पाहावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. मंगळवारी, ११ ऑगस्ट रोजी बलुचिस्तानमधील सुमारे ६ कोटी लोकांनी स्वातंत्र्यदिन साजरा केला. संपूर्ण बलुचिस्तानमध्ये झेंडे फडकावण्यात आले आणि स्वातंत्र्याची गीते गायली गेली.
बलुच मानवाधिकार कार्यकर्ते मीर यार बलुच यांनी आरोप केला की, पाकिस्तानी लष्कराने बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमांमध्ये अडथळा आणण्यासाठी अनेक कट रचले. संपूर्ण बलुचिस्तानमध्ये सुरक्षा दल तैनात करण्यात आले. रॅली आणि सभा घेण्यावर बंदी घालण्यात आली, तसेच मोबाइल इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली. मात्र, त्यानंतरही लष्कर बलुचांना रोखू शकले नाही.
बलुचांनी तोफा आणि बंदुकांच्या सावटाखाली स्वातंत्र्याचा उत्सव साजरा केला. क्वेटा, नोश्की, कलात, ग्वादर, तुरबत आणि खुजदार यांसारख्या अनेक शहरांमध्ये पहाटेच स्वातंत्र्यदिनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यावेळी बलोच राष्ट्रगीत गायले गेले, मिठाई वाटण्यात आली आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.बलुच नेत्यांनी घोषणा केली आहे की, आता १४ ऑगस्ट रोजी बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार नाही.
दरम्यान, १९४७ मध्ये बलुचिस्तान प्रदेशातील कलात संस्थानाने आपल्या स्वातंत्र्याची घोषणा केली होती. तेव्हापासून गेल्या ७९ वर्षांपासून बलुचिस्तानमधील लोक ११ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा करत असल्याचा दावा केला जातो. मात्र, १९४७ नंतर एका वर्षाच्या आतच पाकिस्तानने बलुचिस्तानच्या प्रदेशावर नियंत्रण मिळवले. या कथित बेकायदेशीर ताब्याविरोधात बलुचिस्तानमधील मानवाधिकार कार्यकर्त्यांचा संघर्ष आजही सुरू आहे.
यापूर्वी नुकतेच ‘रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान’च्या नावाने बलुच नेते मीर यार बलुच यांनी एक पोस्ट प्रसिद्ध केली होती. त्यात पाकिस्तानने बलुचिस्तानच्या ८५ टक्के भूभागावर कब्जा केल्याचा दावा करण्यात आला होता. यासोबतच त्यांनी बलुचिस्तानला स्वतंत्र देश घोषित केले होते. या नव्या देशासाठी स्वतंत्र प्रशासकीय व्यवस्था, नवीन राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत तसेच ‘बलोची फालूस’ या नावाने नवीन चलन जाहीर करण्यात आल्याचेही सांगण्यात आले होते. या दस्तऐवजात बलुच फुटीरतावाद्यांनी पाकिस्तानपासून स्वातंत्र्याची घोषणा केल्याचा दावा करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode