झिम्बाब्वेमध्ये प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटली; १५ जणांचा मृत्यूची भीती, २० हून अधिक बेपत्ता
हरारे, 12 ऑगस्ट (हिं.स.)।झिम्बाब्वेमधून एक अत्यंत दुःखद घटना समोर आली आहे. झिम्बाब्वेतील करिबा सरोवरात 95 प्रवाशांना घेऊन जाणारी एक बोट उलटली. या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, 20 हून अधिक जण बेपत्ता असल्याची माहि
झिम्बाब्वेमध्ये प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटली; १५ जणांचा मृत्यूची भीती, २० हून अधिक बेपत्ता


हरारे, 12 ऑगस्ट (हिं.स.)।झिम्बाब्वेमधून एक अत्यंत दुःखद घटना समोर आली आहे. झिम्बाब्वेतील करिबा सरोवरात 95 प्रवाशांना घेऊन जाणारी एक बोट उलटली. या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, 20 हून अधिक जण बेपत्ता असल्याची माहिती आहे.

पोलिस आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी झिम्बाब्वेतील करिबा सरोवरात ही भीषण दुर्घटना घडली. उत्तरेकडील करिबा शहर आणि अनेक बेटे तसेच मासेमारीच्या छावण्यांदरम्यान प्रवासी वाहतूक करणारी ही बोट मोठ्या लाटांच्या तडाख्याने उलटली. करिबा सरोवर हे झिम्बाब्वे आणि झांबियाच्या सीमेवर वसलेले आहे. हे राजधानी हरारेपासून 300 किलोमीटरहून अधिक ईशान्येला आहे. पाण्याच्या साठ्याच्या दृष्टीने हे जगातील सर्वात मोठ्या मानवनिर्मित सरोवरांपैकी एक आहे.

पोलिसांनी सांगितले की, या बोटीत 90 प्रवासी आणि पाच कर्मचारी असे एकूण 95 जण होते. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, खराब हवामान असतानाही बोट सकाळी नेहमीप्रमाणे प्रवासाला निघाली होती. मात्र, एका मोठ्या लाटेचा बोटीला जोरदार तडाखा बसल्याने तिचे इंजिन बंद पडले असावे आणि त्यानंतर नौका उलटली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मतुसाडो नॅशनल पार्कने बचावकार्याला मदत करण्यासाठी एक हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिले. तसेच स्थानिक प्रशासन आणि लष्कराकडून मोठ्या बोटी तसेच प्रशिक्षित गोताखोरही बचावकार्यात सहभागी झाले. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, आतापर्यंत सुमारे 60 जणांना वाचवण्यात यश आले आहे. मृतदेह ओळख पटवण्यासाठी करिबा येथे नेण्यात येणार आहेत. नौकेपर्यंत पोहोचण्यासाठी बचाव पथकाला बराच वेळ लागला आणि दुर्दैवाने या दुर्घटनेत काही जणांचा जीव गेला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande