
छत्रपती संभाजीनगर, 12 ऑगस्ट (हिं.स.)। पालकमंत्र्यांच्या नावाने थायलंड ट्रिपचे आमिष दाखवून ५०० रुपये उकळले असल्याची खळबळजनक माहिती हाती आली आहे. सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या नावाचा गैरवापर करून थायलंड व श्रीलंकेच्या मोफत सहलीचे आमिष दाखवत नागरिकांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. समतानगर येथील ७० वर्षीय महिलेने प्रत्येकी ५०० रुपये घेतल्याचा आरोप आहे. याप्रकरणी जवाहर कॉलनीतील ३५ वर्षीय महिलेच्या फिर्यादीवरून जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
संबंधित महिलेने परिसरातील महिलांना एकत्र करून पालकमंत्री नागरिकांना आठ दिवसांच्या थायलंड-श्रीलंका सहलीवर नेणार असल्याचे सांगितले. यासाठी प्रत्येकी ५०० रुपये, आधारकार्डची प्रत आणि फोटो घेतले. मात्र, प्रवासाच्या तारखा वारंवार बदलल्याने नागरिकांना संशय आला. त्यांनी पालकमंत्र्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता अशी कोणतीही सहल आयोजित केली नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis