
इस्लामाबाद, 12 ऑगस्ट (हिं.स.)।पाकिस्तानमध्ये पेट्रोल पंप चालकांनी संपाची घोषणा केली आहे. पाकिस्तान पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने मंगळवारी घोषणा केली की, १५ ऑगस्टपासून देशभरातील पेट्रोल पंप बंद ठेवण्यात येतील. सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर आंदोलन सुरूच ठेवण्यात येईल, असा इशारा डीलर्सनी दिला आहे. मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी असोसिएशनने सरकारला ७२ तासांची मुदत दिली आहे.
पाकिस्तान पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष मलिक खुदा बख्श यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत पेट्रोल पंप बंद ठेवण्याच्या निर्णयाची माहिती दिली. डीलर्सच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.डीलर्सच्या म्हणण्यानुसार, सरकारने त्यांच्या मागण्यांवर सहमती दर्शवली नाही, तर १५ ऑगस्टपासून पेट्रोल पंप बंद करण्यात येतील आणि मागण्या पूर्ण होईपर्यंत हा संप सुरू राहील.
मलिक खुदा बख्श यांच्या म्हणण्यानुसार, पेट्रोलियम डीलर्स गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोलवर ८ टक्के मार्जिन देण्याची मागणी करत आहेत. असोसिएशनच्या सुमारे १४ हजार सदस्यांकडून या मागणीसाठी सातत्याने सरकारवर दबाव टाकला जात आहे. डीलर्सनी सरकारला आपल्या मागण्यांवर कार्यवाही करण्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी दिला होता. मात्र, ही मुदत आता संपली आहे.
यापूर्वी २२ जुलै रोजी ऑल पाकिस्तान पेट्रोल पंप ओनर्स असोसिएशनने प्रस्तावित पेट्रोल पंप बंद आंदोलन दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलले होते. त्यावेळी पेट्रोलियम मंत्री अली परवेझ मलिक यांनी डीलर्सच्या समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले होते. असोसिएशनने पाकिस्तानच्या पेट्रोलियम मंत्रालयाकडे पेट्रोलच्या दररोजच्या किमती निश्चित करण्याच्या धोरणाचा आढावा घेण्याची मागणीही केली आहे.
दरम्यान, १७ जुलै रोजी पाकिस्तानचे पेट्रोलियम मंत्री अली परवेझ मलिक आणि माहिती मंत्री अत्ता तरार यांनी सांगितले होते की, जागतिक बाजारातील तेलाच्या किमतींमध्ये होणाऱ्या चढ-उतारांच्या पार्श्वभूमीवर इंधनाच्या किमतींमध्ये दररोज बदल केला जाईल.त्यांनी सांगितले होते की, ऑइल अँड गॅस रेग्युलेटरी अथॉरिटी आपल्या वेबसाइटवर सुधारित इंधनाच्या किमती जाहीर करेल. आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थितीनुसार इंधनाचे दर निश्चित केले जाणार आहेत. यापूर्वी मार्चच्या सुरुवातीपासून पाकिस्तान सरकार साप्ताहिक आधारावर इंधनाच्या किमती निश्चित करत होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode