
वॉशिंग्टन, 12 ऑगस्ट, (हिं.स.) - भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानानंदने ग्रँड चेस टूर स्पर्धा असलेल्या सिंकफील्ड कपच्या दुसऱ्या फेरीत जावोखिर सिंदारोव्हचा बचाव भेदत आपला पहिला विजय नोंदवला. दुसऱ्या फेरीत प्रज्ञानानंदचे वर्चस्व होते. त्याने वजीरासमोर असलेल्या प्याद्याने सुरुवात केली आणि हळूहळू आपली स्थिती मजबूत करून अखेरीस विजय मिळवला.
काळ्या मोहऱ्यांसह खेळणाऱ्या सिंदारोव्हने सामना बरोबरीत सोडवण्यास पसंती दिली होती. पण तो प्रज्ञानानंदच्या निर्धाराचा अंदाज लावू शकला नाही. याचा फायदा भारतीय बुद्धिबळपटूला झाला, ज्याने ९५ चालींमध्ये विजय मिळवला. उझबेकिस्तानचा सिंदारोव्ह या वर्षाच्या अखेरीस विश्वविजेतेपदासाठी विश्वविजेता डी. गुकेशचा सामना करावा लागणार आहे.
या विजयामुळे प्रज्ञानानंदच्या गुणांमध्ये १.५ गुणांची भर पडली. त्याने पहिली फेरी बरोबरीत सोडवली होती. दरम्यान, पहिल्या फेरीत विजय मिळवणारा एकमेव बुद्धिबळपटू, अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनाने नेदरलँड्सच्या अनिश गिरीविरुद्ध सामना बरोबरीत सोडवला.
दुसऱ्या फेरीत प्रज्ञानानंदसह चार बुद्धिबळपटूंनी विजय मिळवला. अमेरिकेच्या लेव्हॉन अरोनियनने जर्मनीच्या व्हिन्सेंट केमरला, अमेरिकेच्या वेस्ली सोने नेदरलँड्सच्या जॉर्डन व्हॅन फोरिस्टला आणि फ्रान्सच्या मॅक्सिम व्हॅशियर-लाग्रेव्हने अमेरिकेच्या सॅव्हियन सॅम्युअलला पराभूत केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे