
ढाका, 13 ऑगस्ट (हिं.स.)।बांग्लादेश सध्या गंभीर वीज आणि ऊर्जा संकटाचा सामना करत आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, देशातील अनेक भागांमध्ये दररोज ८ ते १० तासांपर्यंत वीजपुरवठा खंडित होत आहे. संकटाची तीव्रता लक्षात घेता, तारिक रहमान यांच्या सरकारने वीज बचतीसाठी शॉपिंग मॉल, दुकाने आणि बाजारपेठा रात्री ८ वाजेपर्यंत बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. याचा थेट परिणाम शेतकरी, व्यापारी आणि उद्योगांवर होत आहे.या संकटातून बाहेर पडण्यासाठी बांग्लादेश आता भारताकडे मदतीच्या अपेक्षेने पाहत आहे.
वृत्तानुसार, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणातील वीजकपातीमुळे काही ठिकाणी स्थानिक नागरिकांनी वीज केंद्रांवर हल्लेही केले आहेत. त्यामुळे वीज संघटनांना ग्रीड, सबस्टेशन आणि वीज कार्यालयांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची मदत घ्यावी लागली आहे. गेल्या काही दिवसांत स्थानिक पोलिस ठाण्यांना इलेक्ट्रिसिटी कोऑपरेटिव्हकडून पत्रे मिळाली असून, त्यात ग्रीड आणि सबस्टेशनवर पोलिसांची तैनाती तसेच रात्री नियमित गस्त घालण्याची मागणी करण्यात आली आहे. सैदपूर, नीलफामारी आणि कुश्तिया येथे तोडफोड आणि जाळपोळीच्या घटनाही समोर आल्या आहेत.
वृत्तानुसार, या वीज संकटाचा सर्वाधिक परिणाम राजधानी ढाक्याच्या बाहेरील ग्रामीण भागांमध्ये झाला आहे. या भागांमध्ये ८ ते १० तासांपर्यंत वीजकपात होत आहे. त्यातच तीव्र उष्णतेमुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, देशातील विजेची मागणी सुमारे १८ हजार मेगावॅट असताना, वीजपुरवठा १३ हजार मेगावॅटपर्यंतही पोहोचत नाही.काही भागांमध्ये वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर हल्ले झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. वृत्तानुसार, नेत्रोकोना येथे अधिकाऱ्यांना कथितरित्या धमकीचे फोन येत असून, कार्यालयांमध्ये तोडफोड करण्याच्या धमक्याही दिल्या जात आहेत.
बांग्लादेश आपल्या गरजेच्या ९० टक्क्यांहून अधिक तेल आणि सुमारे ३० टक्के गॅस इतर देशांकडून आयात करतो. सध्या निर्माण झालेल्या ऊर्जा संकटामागे नैसर्गिक वायू आणि इंधनाची मोठी कमतरता हे प्रमुख कारण आहे.इंधनाच्या कमतरतेमागे दोन प्रमुख कारणे आहेत. पहिले म्हणजे, जुलै २०२६ मध्ये अमेरिकन कंपनी एक्सेलरेट एनर्जीच्या मालकीच्या एका टर्मिनलला आग लागल्यानंतर एलएनजीचा पुरवठा निम्म्यावर आला. त्यानंतर हे टर्मिनल बंद करण्यात आले. दुसरे कारण म्हणजे, समुद्रातील खराब हवामानामुळे अनेक एलएनजी वाहू जहाजे वेळेवर बांग्लादेशात पोहोचू शकली नाहीत.याशिवाय, बाहेरून आयात होणाऱ्या वीजपुरवठ्यातही घट झाली आहे.
या गंभीर संकटातून बाहेर पडण्यासाठी बांग्लादेश भारताकडे मदतीची अपेक्षा करत आहे. बांग्लादेशने भारताकडे अतिरिक्त डिझेल पुरवठ्याची मागणी केली आहे.गेल्या आठवड्यात बांग्लादेशचे ऊर्जा मंत्री इक्बाल हसन महमूद यांच्यासोबत झालेल्या बैठकीदरम्यान भारतीय उच्चायुक्त दिनेश त्रिवेदी यांना याबाबत माहिती देण्यात आली. हसन महमूद यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी भारताकडे अधिक डिझेल उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे.
महमूद यांनी पत्रकारांना सांगितले की, भारतासोबत एक पाइपलाइन आहे, ज्यातून बांगलादेशला डिझेल मिळते. त्यांनी भारताला याचा पुरवठा वाढवण्याची विनंती केली आहे. भारत आणि बांगलादेश दरम्यान इंडिया-बांगलादेश फ्रेंडशिप पाइपलाइन 2017 मध्ये सुरू झाली होती. दोन्ही देशांमध्ये 15 वर्षांचा करार आहे. या अंतर्गत भारताला दरवर्षी बांगलादेशला 1.80 लाख मेट्रिक टन डिझेल द्यावे लागते. पश्चिम आशियात अलीकडील संकटाच्या काळात भारताने मार्च आणि एप्रिलमध्ये बांगलादेशला आधीच 30 हजार टनांहून अधिक डिझेल पाठवले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode