
टोकियो , 14 ऑगस्ट (हिं.स.)।जपानमधील टोकियोच्या पूर्वेकडील शहरांमध्ये रात्रभर झालेल्या विक्रमी पावसामुळे रस्ते आणि अनेक घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे हजारो लोक अडकून पडले, वीजपुरवठा खंडित झाला असून किमान चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण बेपत्ता आहे.
जपान हवामान संस्थेने (जेएमए) चिबा प्रांतातील डझनहून अधिक नगरपालिकांसाठी मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या सर्वात गंभीर इशाऱ्याची पातळी शुक्रवारी सकाळी पाऊस कमी झाल्यानंतर कमी केली. मात्र, दिवसभरात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिवस उजाडल्यानंतर घेण्यात आलेल्या छायाचित्रांमध्ये आणि दूरचित्रवाणीवरील दृश्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले. अनेक घरे, वाहने आणि रेल्वे रुळांचे काही भाग चिखलमिश्रित पाण्याखाली गेले आहेत.
ग्राउंड सेल्फ-डिफेन्स फोर्सने सांगितले की, सोगा रेल्वे स्थानकावर रात्रभर अडकून पडलेल्या सुमारे ४,००० लोकांना बाहेर काढण्यासाठी बस पाठवण्यात आल्या. सोगा रेल्वे स्थानक हे टोकियो डिस्ने पार्कशी जोडणाऱ्या स्थानिक रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक आहे. मात्र, थीम पार्कचे कोणतेही नुकसान झालेले नाही. टोकियो परिसराला सेवा देणाऱ्या नारिता विमानतळावरही हजारो प्रवासी अडकून पडले, कारण या भागातून जाणाऱ्या रेल्वे सेवा थांबवण्यात आल्या होत्या. चिबा प्रांतातील सरकारी इमारतीत शेकडो लोकांनी रात्रभर आश्रय घेतला.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, चिबा प्रांतात चार जणांचा मृत्यू झाला असून एक जण बेपत्ता आहे. मृतांमध्ये इचिकावा शहरातील पुराच्या पाण्याने भरलेल्या रस्त्यावर तरंगताना आढळलेल्या एका व्यक्तीचा आणि साकुरा शहरात पुराच्या पाण्यात अडकलेल्या कारमधील एका महिलेचा समावेश आहे. काशिवा शहरात पुराच्या पाण्यात अडकलेल्या कारमधून बाहेर काढण्यात आलेल्या आणखी एका व्यक्तीलाही मृत मानण्यात आले आहे.
चिबा प्रशासनाने सांगितले की, प्रांतातील ८० हून अधिक घरांना पुराचा फटका बसला आहे. तसेच, सुमारे २ लाख ३० हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी किंवा निवारा केंद्रांमध्ये जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
टेप्को पॉवर ग्रिडनुसार, मुसळधार पाऊस आणि पुरामुळे शुक्रवारी सकाळी सुमारे २३ हजार घरांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. यापूर्वी हा आकडा ६८ हजारांपर्यंत पोहोचला होता.
चिबा शहरात अवघ्या एका तासात ११.५ सेंटीमीटर पावसाची विक्रमी नोंद झाली. तर साकुरा शहरात एका तासात ९.७ सेंटीमीटर पाऊस पडला, जो तेथील नवा विक्रम ठरला आहे.जेएमए चे हवामान अंदाज अधिकारी ताकुया होसोमी यांनी आपत्कालीन पत्रकार परिषदेत सांगितले की, अभूतपूर्व पातळीवरील पावसाची नोंद झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode