
तेहरान, 13 ऑगस्ट (हिं.स.)।इराणने डोनाल्ड ट्रम्प यांच्या होर्मुझ सामुद्रधुनीवर अमेरिकेचे पूर्ण नियंत्रण असल्याच्या दाव्याला फेटाळून लावले आहे. इराणच्या म्हणण्यानुसार, हा महत्त्वाचा सागरी मार्ग अद्याप बंद असून, तेहरानच्या अटी मान्य होईपर्यंत तो पुन्हा खुला केला जाणार नाही.
पर्शियन गल्फ स्ट्रेट अथॉरिटीने (पीजीएसए) ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, ट्रम्प यांचे दावे आणि अमेरिकन अधिकाऱ्यांकडून वारंवार करण्यात येणाऱ्या वक्तव्यांमुळे परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. पीजीएसएने म्हटले, “अमेरिकन अधिकाऱ्यांचे दावे आणि होर्मुझ सामुद्रधुनी आता बंद नाही, असे वारंवार केले जाणारे पोस्ट यामुळे वास्तव बदलत नाही. होर्मुझ अजूनही बंद आहे आणि इराणच्या अटी मान्य होईपर्यंत तो पुन्हा खुला केला जाणार नाही.”
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’वर होर्मुझ सामुद्रधुनीवर अमेरिकेचे पूर्ण नियंत्रण असल्याचा दावा केल्यानंतर इराणकडून हे वक्तव्य करण्यात आले. ट्रम्प यांनी अमेरिकन नौदलाची तैनाती ही ‘स्टीलची भिंत’ असल्याचे सांगत, इराण त्याचे काहीही नुकसान करू शकत नाही, असा दावा केला. तसेच तेहरानची लष्करी यंत्रणा मोठ्या प्रमाणात कमकुवत झाल्याचेही त्यांनी म्हटले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले, “त्यांच्याकडे केवळ फेक न्यूज आणि 300 टक्के महागाई आहे आणि परिस्थिती आणखी बिघडत चालली आहे. इराण केवळ बोलतो, प्रत्यक्षात काहीही करत नाही. आता तो मध्यपूर्वेचा ‘दादा’ राहिलेला नाही. अल्लाहचे आभार.”होर्मुझ सामुद्रधुनीवरून सुरू असलेल्या दीर्घकाळाच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी ही टिप्पणी केली आहे. हा सागरी मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण जगातील सुमारे 20 टक्के पेट्रोलियम व्यापार या मार्गातून होतो.
गेल्या काही आठवड्यांपासून या भागात इराण, इस्रायल आणि अमेरिकन सैन्यादरम्यान सुरू असलेल्या लष्करी हालचालींमुळे तणाव वाढला आहे. या परिस्थितीमुळे मोठ्या संघर्षाची शक्यता आणखी वाढली आहे. इराणने वारंवार इशारा दिला आहे की, इराणवरील बाह्य दबाव वाढत राहिल्यास समुद्री वाहतूक मर्यादित किंवा बाधित केली जाऊ शकते.
या पार्श्वभूमीवर वॉशिंग्टनने आखाती भागात आपल्या नौदलाची उपस्थिती वाढवली आहे. तसेच समुद्री वाहतुकीचे स्वातंत्र्य सुनिश्चित करणे हे अमेरिकेच्या सुरक्षेच्या प्रमुख उद्दिष्टांपैकी एक असल्याचे पुन्हा स्पष्ट केले आहे.ट्रम्प यांच्या वक्तव्यांसोबतच पडद्यामागे राजनैतिक चर्चाही सुरू आहेत. वॉशिंग्टन आणि तेहरानचे प्रतिनिधी होर्मुझमधील संकट कमी करण्यासाठी तसेच नियमित समुद्री वाहतूक पुन्हा सुरू करण्याच्या अटींबाबत अप्रत्यक्ष चर्चा करत आहेत. इराणच्या सुप्रीम नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलचे नवे प्रमुख मोहसिन रेजाई यांनी इशारा दिला आहे की, अमेरिका सर्व अटी पूर्ण करेपर्यंत तेहरान धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाची होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करणार नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode