
मॉस्को, 13 ऑगस्ट (हिं.स.)।रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गुरुवारी कुरिल बेटसमूहातील इटुरुप बेटाला भेट दिली. या बेटावर जपान आपला हक्क सांगत असून, पुतिन यांचा या बेटावरील हा पहिलाच दौरा आहे. पुतिन यांच्या भेटीनंतर जपानने तीव्र विरोध नोंदवत इटुरुपला आपला अविभाज्य भूभाग असल्याचे म्हटले. दुसरीकडे, पुतिन यांनी दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेली परिस्थिती आंतरराष्ट्रीय दस्तऐवजांमध्ये नोंदवलेले वास्तव असल्याचे सांगितले.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी प्रशांत महासागरात असलेल्या कुरिल बेटसमूहाच्या दक्षिण भागातील इटुरुप बेटाला भेट दिली. हे बेट सध्या रशियाच्या नियंत्रणाखाली आहे; मात्र जपान या बेटांवर आपला प्रादेशिक दावा करतो.पुतिन यांनी इटुरुपमधील एका मत्स्यप्रक्रिया प्रकल्पाला, रुग्णालयाला आणि शाळेला भेट दिली. त्यांनी स्थानिक नागरिकांशी थोडक्यात संवाद साधला. तसेच रशियाच्या साखालिन प्रांताचे गव्हर्नर व्हॅलेरी लिमारेन्को यांचीही भेट घेतली.
दरम्यान, जपानचे परराष्ट्रमंत्री तोशिमित्सु मोतेगी यांनी पुतिन यांच्या इटुरुप दौऱ्याचा तीव्र निषेध केला. जपान या बेटाला ‘एटोरुफू’ असे संबोधतो. मोतेगी यांनी सांगितले की, ऐतिहासिक तसेच आंतरराष्ट्रीय कायद्याच्या दृष्टीने जपान या बेटांवर आपला अधिकार असल्याचा दावा करतो. यापूर्वी २०२१ मध्येही रशियाचे तत्कालीन पंतप्रधान मिखाईल मिशुस्तिन यांनी इटुरुपला भेट दिली होती. त्यावेळीही जपानने तीव्र विरोध नोंदवला होता.
जपान कुरिल बेटसमूहातील चार सर्वात दक्षिणेकडील बेटांवर आपला प्रादेशिक हक्क सांगतो आणि त्यांना ‘नॉर्दर्न टेरिटरीज’ असे संबोधतो. दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरच्या काळात सोव्हिएत संघाने ही बेटे जपानकडून आपल्या ताब्यात घेतली होती.या प्रादेशिक वादामुळे रशिया आणि जपान यांच्यात दुसऱ्या महायुद्धाचा औपचारिक शेवट करणारा शांतता करार अद्याप होऊ शकलेला नाही. अनेक दशकांपासून दोन्ही देशांमध्ये या मुद्द्यावर चर्चा सुरू आहे; मात्र अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही.
गेल्या काही वर्षांत रशियाने कुरिल बेटांवरील आपली लष्करी उपस्थिती वाढवली आहे. त्यामुळे या प्रदेशाबाबत मॉस्कोची भूमिका अधिक ठाम असल्याचे संकेत मिळत आहेत.पुतिन यांच्या या भेटीपूर्वीही रशियाचे राष्ट्राध्यक्ष सायबेरिया आणि सुदूर पूर्वेकडील अनेक भागांच्या दौऱ्यावर होते. त्यांनी साखालिन बेटाला भेट देऊन रशियाच्या पॅसिफिक फ्लीटच्या लष्करी सरावाच्या अंतिम टप्प्यात सहभाग घेतला.
पुतिन यांनी बुधवारी एका युद्धनौकेवरून बोलताना म्हटले की, कुरिल बेटांची सध्याची स्थिती ही दुसऱ्या महायुद्धाच्या निकालानंतर निर्माण झालेली वास्तविकता असून, ती आंतरराष्ट्रीय दस्तऐवजांमध्ये नोंदवली गेली आहे.मात्र, त्याचवेळी रशिया आणि जपानमध्ये शांतता करार करण्याच्या उद्देशाने तोडगा शोधण्यासाठी रशिया तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पुतिन यांनी जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यासह अनेक जपानी नेत्यांसोबत मॉस्कोचे रचनात्मक संबंध राहिल्याचा उल्लेख केला.
पुतिन यांनी सांगितले की, रशियाने युक्रेनमध्ये लष्करी कारवाई सुरू केल्यानंतर जपानची भूमिका बदलली. जपानने २०२२ मध्ये रशियावर निर्बंध लागू केले होते. तरीही, रशिया आपल्या सर्व शेजारी देशांसोबत, त्यात जपान आणि या प्रदेशातील इतर देशांचाही समावेश आहे, सहकार्य करण्यास तयार असल्याचे पुतिन यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode