
अबू धाबी, 14 ऑगस्ट (हिं.स.)।होर्मुज सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) सरकारी मालकीच्या तेल कंपनी अबू धाबी नॅशनल ऑइल कंपनी (एडीएनओसी) च्या दोन जहाजांवर झालेल्या हल्ल्याची पुष्टी झाल्यानंतर युएईने इराणवर गंभीर आरोप केले आहेत. अबू धाबीने या हल्ल्यांचा तीव्र निषेध करत, हे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठराव क्रमांक 2817चे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. तसेच युएईने इराणला शत्रुत्वाची कृत्ये थांबवून होर्मुज सामुद्रधुनी कोणत्याही अटींशिवाय पूर्णपणे खुली करण्याची मागणी केली आहे.
अबू धाबी नॅशनल ऑइल कंपनीनुसार, या घटनेत कोणालाही दुखापत झाल्याचे वृत्त नाही आणि परिस्थिती नियंत्रणात आहे. सोशल मीडियावर जारी केलेल्या निवेदनात युएईच्या परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्यांचा तीव्र निषेध करत इराणला तात्काळ हल्ले थांबवण्याचे आवाहन केले.मंत्रालयाने म्हटले की, व्यावसायिक जहाजांना लक्ष्य करणे आणि आंतरराष्ट्रीय सागरी मार्गांवरील वाहतूक विस्कळीत करणे ही गंभीर चिंतेची बाब आहे. परराष्ट्र मंत्रालयाने ठामपणे सांगितले की, हा हल्ला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठराव क्रमांक 2817चे उघड उल्लंघन आहे. या ठरावात सागरी मार्गांवरील मुक्त नौवहनाच्या महत्त्वाची पुष्टी करण्यात आली असून, व्यावसायिक जहाजांना लक्ष्य करणे आणि आंतरराष्ट्रीय जलमार्गांमध्ये अडथळे निर्माण करण्यास विरोध करण्यात आला आहे.
युएईच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, व्यावसायिक जहाजांना लक्ष्य करणे आणि होर्मुज सामुद्रधुनीचा आर्थिक दबाव किंवा ब्लॅकमेलिंगचे साधन म्हणून वापर करणे हे इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सकडून करण्यात येणाऱ्या समुद्री चाच्यांच्या कृत्यांसमान आहे.युएईच्या मते, अशा कारवायांमुळे प्रादेशिक स्थैर्य, या भागात राहणाऱ्या नागरिकांची सुरक्षितता आणि जागतिक ऊर्जा सुरक्षेला थेट धोका निर्माण होतो.
युएईच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले, “ युएईने इराणकडून हे विनाप्रक्षोभ हल्ले थांबवण्याची आणि सर्व प्रकारच्या शत्रुत्वाच्या कारवाया तात्काळ समाप्त करण्यासाठी पूर्ण बांधिलकी सुनिश्चित करण्याची गरज अधोरेखित केली आहे. तसेच प्रादेशिक सुरक्षेच्या रक्षणासाठी होर्मुज सामुद्रधुनी पूर्णपणे आणि कोणत्याही अटींशिवाय पुन्हा खुली करण्याची मागणी केली आहे.”
सरकारी वृत्तसंस्थाच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, अबू धाबी नॅशनल ऑइल कंपनीने या घटनेची पुष्टी केली आहे. कंपनीने सांगितले की, हल्ल्यात कोणालाही दुखापत झालेली नाही आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे. एका निवेदनात एडीएनओसीने नौवहनाचे स्वातंत्र्य आणि सागरी सुरक्षा कायम ठेवण्याबरोबरच नाविकांची सुरक्षितता आणि त्यांच्या कल्याणाचे संरक्षण करण्याच्या महत्त्वावर भर दिला. सागरी वाहतुकीची सुरक्षित आणि अखंडित हालचाल सुनिश्चित करण्याची गरजही कंपनीने अधोरेखित केली.या हल्ल्याला बळी पडलेल्या विशिष्ट जहाजांची नावे किंवा त्यांचे किती नुकसान झाले, याबाबत अहवालात कोणतीही सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही. तसेच हल्ल्यासाठी कोणत्या प्रकारची शस्त्रे किंवा साधने वापरण्यात आली, हेही अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सरकारी मालकीची एडीएनओसी ही जगातील सर्वात मोठ्या तेल आणि वायू उत्पादक कंपन्यांपैकी एक असून, युएईच्या अर्थव्यवस्थेत तिची महत्त्वाची भूमिका आहे. होर्मुज सामुद्रधुनी हा जागतिक ऊर्जा व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा सागरी मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या व्यावसायिक जहाजांवर कोणत्याही प्रकारचा हल्ला झाल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावरील तेल आणि वायूच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode