जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप : सिंधूची विजयी सलामी, त्रिसा-गायत्री जोडीचीही आगेकूच
नवी दिल्ली, 17 ऑगस्ट (हिं.स.) - दोन वेळच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या पीव्ही सिंधूने आयर्लंडच्या सोफिया नोबलला सरळ गेममध्ये पराभूत करून शानदार कामगिरी केली आणि दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. सिंधू बीडब्ल्यूएफ जागतिक चॅम्पियनशिपमध्ये आपल्या सहाव्या पदकाच्या
पीव्ही सिंधू


नवी दिल्ली, 17 ऑगस्ट (हिं.स.) - दोन वेळच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या पीव्ही सिंधूने आयर्लंडच्या सोफिया नोबलला सरळ गेममध्ये पराभूत करून शानदार कामगिरी केली आणि दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. सिंधू बीडब्ल्यूएफ जागतिक चॅम्पियनशिपमध्ये आपल्या सहाव्या पदकाच्या शोधात आहे. नववे मानांकित सिंधूने नोबलवर २१-७, २१-११ असा विजय मिळवला. सिंधूने आतापर्यंत या चॅम्पियनशिपमध्ये दोन कांस्य पदके, दोन रौप्य पदके आणि २०१९ मध्ये एक सुवर्णपदक जिंकले आहे.

पाच वेळच्या जागतिक चॅम्पियनशिप पदक विजेत्या सिंधूने हा सामना अवघ्या २९ मिनिटांत जिंकला.तिने सुरुवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व गाजवले आणि आपला अनुभव व संयमी खेळ वापरून सोफियाला सतत दबावाखाली ठेवले. पहिल्या गेममध्ये मध्यंतरापर्यंत सिंधूने ११-२ अशी भक्कम आघाडी घेतली, त्यानंतर तिने तो गेम सहज जिंकला.दुसऱ्या गेममध्ये नोबलने अधिक चांगले आव्हान उभे केले आणि एका क्षणी ती सिंधूला कडवी झुंज देत असल्याचे दिसत होते. पण भारतीय खेळाडूने आपल्या अनुभवाचा वापर करून ब्रेकपर्यंत ११-८ अशी आघाडी घेतली. त्यानंतर सिंधूने आपल्या प्रतिस्पर्धीला पुनरागमन करण्याची कोणतीही संधी दिली नाही. तिने शानदार ड्रॉप शॉट्स आणि शक्तिशाली स्मॅशच्या जोरावर खेळावर नियंत्रण ठेवले आणि नेटजवळ एका जबरदस्त बॅकहँड ड्रॉप शॉटने सामना संपवला. पुढच्या फेरीत सिंधूचा सामना कॅनडाच्या वेन यू झांगशी होईल.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी स्पेनच्या पॉला लोपेझ आणि लुसिया रॉड्रिग्ज यांच्यावर २१-९, २१-१३ असा सहज विजय मिळवून महिला दुहेरीतील आपल्या मोहिमेला सुरुवात केली. पुढील फेरीत या भारतीय जोडीचा सामना अमेरिकेच्या १६व्या मानांकित लोरेम लॅम आणि ॲलिसन क्विन यांच्याशी होईल. भारताची सलामीची जोडी हरिहरन आमसाकरुनन आणि एम. आर. अर्जुन यांनीही दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय जोडीविरुद्धच्या पुरुष दुहेरीच्या पहिल्या फेरीत, स्कॉट गिल्डिया आणि पॉल रेनॉल्ड्स १६-२१, ४-६ ने पराभूत झाल्यानंतर सामन्यातून निवृत्त झाले. हरिहरन आणि अर्जुन यांचा सामना आता कोरियाच्या १५व्या मानांकित मिन ह्युक कांग आणि डोंग जू की यांच्याशी होईल, ज्यांना पहिल्या फेरीत बाय मिळाला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande