
बीड, 18 ऑगस्ट (हिं.स.) : बीड जिल्हा रुग्णालयात सीझर शस्त्रक्रियेदरम्यान वैद्यकीय हलगर्जीपणा झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. १ ऑगस्ट रोजी प्रसूतीसाठी दाखल झालेल्या १९ वर्षीय संध्या सूरज गायकवाड यांच्या शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या पोटात सर्जिकल हातमोजे आणि कागद राहिल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. सध्या त्यांच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
संध्या यांच्यावर १ ऑगस्ट रोजी बीड जिल्हा रुग्णालयात सीझर शस्त्रक्रिया करण्यात आली. चार दिवसांनी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. मात्र, त्यानंतर पोटात तीव्र वेदना सुरू झाल्याने कुटुंबीयांनी त्यांना खासगी रुग्णालयात नेले. तेथे सोनोग्राफी आणि अन्य तपासण्यांनंतर पोटात अनोळखी वस्तू असल्याचे निदान झाल्याचे सांगण्यात आले.
त्यानंतर संध्या यांना पुण्यातील ससून रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे करण्यात आलेल्या दुसऱ्या शस्त्रक्रियेत पोटातून सर्जिकल हातमोजे आणि कागद काढण्यात आल्याचा कुटुंबीयांचा दावा आहे.
या घटनेनंतर बीड जिल्हा आरोग्य प्रशासनाने संबंधित महिला डॉक्टर आणि शस्त्रक्रियेदरम्यान उपस्थित वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्याची माहिती आहे. प्रकरणाची चौकशी सुरू असून दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्याचे आश्वासन आरोग्य विभागाने दिले आहे. दरम्यान, या कथित हलगर्जीपणामुळे रुग्णाच्या उपचाराबाबत आणि शासकीय आरोग्य व्यवस्थेतील दक्षतेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत
--------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis