अकोल्यात जागतिक छायाचित्र दिनानिमित्त आगळीवेगळी 'कॅमेरा दिंडी'
- विंटेज आणि बॉक्स कॅमेऱ्यांची पालखीतून मिरवणूक अकोला, 19 ऑगस्ट (हिं.स.)। जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधून अकोला शहरात आज एक अत्यंत अनोखा आणि वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम पाहायला मिळाला. अकोला-बुलढाणा फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने अकोला शहरात भव्य
Photo


- विंटेज आणि बॉक्स कॅमेऱ्यांची पालखीतून मिरवणूक

अकोला, 19 ऑगस्ट (हिं.स.)।

जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधून अकोला शहरात आज एक अत्यंत अनोखा आणि वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम पाहायला मिळाला. अकोला-बुलढाणा फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने अकोला शहरात भव्य 'कॅमेरा दिंडी'चे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे पालखीतून काढण्यात आलेली विंटेज आणि जुन्या बॉक्स कॅमेऱ्यांची मिरवणूक. आज सकाळी अकोला शहराचे आराध्य राजेश्वर मंदिराजवळून या कॅमेरा दिंडीला सुरुवात झाली. यामध्ये जिल्ह्यातील ज्येष्ठ तसेच नवोदित छायाचित्रकार मोठ्या संख्येने आपल्या कॅमेऱ्यांसह सहभागी झाले होते. पारंपारिक दिंडीप्रमाणेच याही दिंडीत प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. यावेळी दिंडीचा मार्ग टाळ-मृदंगाच्या आवाजाने दणाणून गेला होता. या दिंडीच्या माध्यमातून छायाचित्रकारांनी शहरातून मार्गक्रमण करत समाजात छायाचित्रणाचे महत्त्व अधोरेखित केले. छायाचित्रण ही केवळ एक कला नसून, समाजातील विविध घटना, मानवी भावना आणि इतिहास जिवंत ठेवणारे एक अत्यंत प्रभावी माध्यम आहे, असा संदेश या निमित्ताने देण्यात आला. अकोल्यातील या आगळ्यावेगळ्या कॅमेरा दिंडीला नागरिकांनीही रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून मोठा प्रतिसाद दिला. विंटेज कॅमेऱ्यांची पालखी आणि शेकडो फोटोग्राफर्सचा उत्साह यामुळे ही दिंडी संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा आणि आकर्षणाचा विषय ठरली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande