
बीड, 18 ऑगस्ट (हिं.स.) : एन.एस.एल. शुगर युनिट-३, पवारवाडी येथील प्रस्तावित नव्या बॉयलरच्या बांधकामाविरोधात हनुमान नगर, निपाणी टाकळी आणि परिसरातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. आवश्यक परवानग्या घेतल्या आहेत का, ग्रामपंचायतीचे नाहरकत प्रमाणपत्र आहे का आणि प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांचे पालन होत आहे का, असे सवाल उपस्थित करत ग्रामस्थांनी उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्राताई अजित पवार आणि मंत्री पंकजाताई मुंडे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.
ग्रामस्थांच्या आरोपानुसार, प्रस्तावित बॉयलरचे बांधकाम रहिवासी घरे, हॉटेल व्यवसाय आणि शेतीपासून अवघ्या १०० ते १५० फुटांच्या अंतरावर सुरू आहे. त्यामुळे भविष्यात नागरिकांच्या आरोग्यासह शेती आणि व्यवसायावर परिणाम होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
यापूर्वी कारखान्याच्या बॉयलरमधून निघणारी काजळी, भुसा आणि धूळ घरांसह शेती, झाडे, हॉटेल तसेच अन्नपदार्थांवर पडत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यामुळे डोळ्यांच्या समस्यांसह नागरिकांना विविध त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
कारखान्यातून सोडण्यात येणाऱ्या रासायनिक मिश्रित सांडपाण्यामुळे परिसरातील विहिरी व बोअरचे पाणी दूषित होत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या पाण्यामुळे शेतीचे नुकसान होत असून, दुर्गंधी आणि जनावरांच्या आरोग्यावरही परिणाम होत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.
नव्या बॉयलरसाठी ग्रामपंचायतीने नाहरकत प्रमाणपत्र दिले आहे का, याबाबत २३ जुलै रोजी ग्रामपंचायतीकडे माहिती मागण्यात आली होती. २९ जुलै रोजी ग्रामपंचायतीने नाहरकत दिलेली नसल्याचे कळविल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे नाहरकत नसताना बांधकाम कोणत्या परवानगीच्या आधारे सुरू आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळ, जालना कार्यालयाकडेही तक्रार करण्यात आली असून, अपेक्षित कार्यवाही झालेली नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. प्रस्तावित बॉयलरचे बांधकाम तातडीने थांबवावे, सर्व परवानग्यांची तपासणी करावी, प्रदूषणाबाबत स्वतंत्र चौकशी करून नुकसान झाल्यास संबंधितांना भरपाई द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis