वर्धा - ‘डोमिनोज पिझ्झा’चा परवाना निलंबित; एफडीएची धडक कारवाई
वर्धा , 19 ऑगस्ट (हिं.स.)। अन्न सुरक्षा कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करणे नामांकित खाद्यपेढ्यांना चांगलेच महागात पडले आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने डोमिनोज पिझ्झा आणि जय कृष्णा बेकरी या दोन्ही आस्थापनांचा अन्न परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित के
‘डोमिनोज पिझ्झा’चा परवाना निलंबित


वर्धा , 19 ऑगस्ट (हिं.स.)। अन्न सुरक्षा कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करणे नामांकित खाद्यपेढ्यांना चांगलेच महागात पडले आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने डोमिनोज पिझ्झा आणि जय कृष्णा बेकरी या दोन्ही आस्थापनांचा अन्न परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित केला आहे. या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

अन्न सुरक्षा अधिकारी रविराज धाबर्डे यांनी मे. जुबिलंट फूड वर्क्स लिमिटेड (डोमिनोज पिझ्झा) आणि मे. जय कृष्णा बेकरी, एमआयडीसी, वर्धा या पेढ्यांची अचानक तपासणी केली होती. या तपासणी दरम्यान दोन्ही ठिकाणी आवश्यक ती स्वच्छता आढळून आली नव्हती. तसेच अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे थेट निदर्शनास आले होते. तपासणीत त्रुटी आढळल्यानंतर, अन्न व औषध प्रशासनाचे तत्कालीन सहायक आयुक्त (अन्न) प्र.भा. टोपले यांनी या आस्थापनांना १५ दिवसांचा कालावधी देणारी ‘सुधारणा नोटीस’ बजावली होती. मात्र, हा कायदेशीर कालावधी उलटून गेल्यानंतरही दोन्ही पेढ्यांनी आपल्या व्यवहारात आवश्यक त्या सुधारणा केल्याबाबतचा कोणताही पूर्तता अहवाल कार्यालयात सादर केला नाही. विहित मुदतीत पूर्तता अहवाल सादर न केल्यामुळे, आस्थापनांची यावर काय भूमिका आहे आणि त्यांनी अहवाल का सादर केला नाही, हे जाणून घेण्यासाठी सहायक आयुक्त (अन्न) प्रवीण उमप यांच्या समक्ष कायदेशीर सुनावणी घेण्यात आली. या सुनावणी दरम्यानदेखील संबंधित पेढ्यांच्या वतीने कोणताही समाधानकारक पूर्तता अहवाल सादर करण्यात आला नाही. यावरून प्रशासनाने दिलेल्या मुदतीनंतरही कायद्यानुसार अपेक्षित सुधारणा करण्यास या पेढ्या अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाले. सुनावणीनंतरही प्रशासनाने मवाळ भूमिका न घेता पेढ्यांना आवश्यक सुधारणा करण्यासाठी पुन्हा एकदा पंधरा दिवसांचा कालावधी दिला होता. परंतु, या अंतिम मुदतीतही पेढीने सुधारणा केल्याचा पूर्तता अहवाल कार्यालयाकडे सादर केला नाही. पेढ्यांकडून अन्नसुरक्षा व मानदे कायद्यानुसार आवश्यक असणाऱ्या कायदेशीर तरतुदींचे सातत्याने उल्लंघन होत असल्याचे सिद्ध झाले. अखेर नागरिकांच्या आरोग्याशी खेळू न देण्याच्या उद्देशाने आणि व्यापक जनहिताचा विचार करून सहायक आयुक्त प्रवीण उमप यांनी दोन्ही आस्थापनांचे अन्न परवाने पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्याचे आदेश जारी केले आहेत. ही कारवाई कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त (अन्न) प्र.भा. टोपले, सहायक आयुक्त (अन्न) प्रवीण उमप यांच्या मार्गदर्शनात सहआयुक्त कृष्णा जायपूरकर, नागपूर यांच्या नेतृत्वात अन्न सुरक्षा अधिकारी रविराज धाबर्डे यांनी केली.

या आढळल्या त्रुटी

तपासणीदरम्यान अन्नविषयक परिसराची स्वच्छता, स्वच्छता वेळापत्रकानुसार किंवा स्वच्छता कार्यक्रमानुसार केली जात नाही आणि परिसराच्या स्वच्छतेसाठी कोणताही कार्यक्रम किंवा वेळापत्रक उपलब्ध नव्हते, अन्नाच्या संपर्कात येणारे पॅकेजिंग साहित्य फूड-ग्रेडचे आहे किवा नाही आणि त्यांचे मान्यताप्राप्त प्रयोगशाळांकडून प्रमाणपत्रे उपलब्ध नव्हते, पेढीत काम करणारे कामगारांचे वैद्यकीय प्रमाणपत्र उपलब्ध नव्हते, पाणी पिण्यायोग्य असल्याचे प्रमाणपत्र उपलब्ध नव्हते, पेढीत माशांचा प्रादुर्भाव आदी गंभीर बाबी आढळल्या. पेढीत मोठ्या प्रमाणात अस्वच्छता व कायद्यानुसार आवश्यक तरतुदींचे पालन केल्याचे आढळून आले नव्हते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande