
नाशिक, 19 ऑगस्ट (हिं.स.)। नाशिकच्या विकासासाठी कुठेही कमी पडणार नाही. नाशिक शहराचा चेहरामोहरा बदलायचा आहे. पुढील ५० वर्षांसाठी नाशिकचा चेहरामोहरा बदललेला असेल, असा निर्धार पालकमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. “सगळ्यांचे मनापासून आभार. गेल्यावेळीसारखाच यावेळी वर्षभरात कुंभमेळा आहे. नाशिक शहरातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सर्व नाशिककरांचे आभार. विशेष करून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा विश्वास सार्थ ठरवू,” असा विश्वास ही गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.
नाशिकच्या विकासासाठी आरोग्य, पायाभूत सुविधा आणि पाण्याच्या सोयी या सर्व व्यवस्था व्यवस्थितपणे पार पडण्यासाठी वेळ देणार असल्याचे महाजन यांनी सांगितले. सिंहस्थ कुंभमेळ्याचे मोठे आव्हान असून, सर्व नाशिककर आणि प्रशासनाच्या सोबतीने हा कुंभमेळा जागतिक पातळीवर केंद्रबिंदू ठरेल, तसेच स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित कुंभमेळा होईल, यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिककरांसाठी मोठी पर्वणी असली तरी विकासाच्या दृष्टीनेदेखील ही मोठी पर्वणी आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरसाठी ४० हजार कोटी रुपये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत. त्यामुळे पुढील अनेक वर्षांसाठी विकासकामे होणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.
महामार्ग सिमेंटचे होत आहेत. शहरातील रस्ते, अंतर्गत कॉलनी रस्ते, ड्रेनेजची व्यवस्था तसेच गोदावरी नदी शुद्ध करण्याचे काम सुरू आहे. या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे नाशिकचे नाव केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात मोठे करायचे आहे. शहर शांत, स्वच्छ आणि सुरक्षित कसे राहील, यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. नाशिक हे आध्यात्मिक आणि धार्मिक शहर असून, येथे पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. उद्योगालाही चालना मिळणार असून, नाशिक जलदगतीने वाढणारे शहर म्हणून महाराष्ट्रात पाहायला मिळेल, असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला. कुंभमेळा मंत्री म्हणून जबाबदारी असताना नाशिकमधील कामे झपाट्याने सुरू करण्यात आली असून, पुढील ५० वर्षे नाशिकच्या रस्त्यांना खड्डे पडणार नाहीत, असा विश्वासही महाजन यांनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI