
मालेगाव, 19 ऑगस्ट (हिं.स.)।
मालेगाव-चाळीसगाव रस्त्यावरील दहिवाळ शिवारात बुधवारी भीषण अपघात झाला. भरधाव ट्रक आणि एसटी बस यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत दोन महिला प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून, २३ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची तीव्रता एवढी होती की, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळगाव वसंत आगाराची नाशिक-पाचोरा ही बस ४० पेक्षा अधिक प्रवाशांना घेऊन जात होती. मालेगावहून चाळीसगावकडे जात असताना दहिवाळ शिवारात चाळीसगावकडून येणाऱ्या भरधाव ट्रकशी बसची समोरासमोर जोरदार धडक झाली. दोन्ही वाहनांचा वेग अधिक असल्याने अपघाताची तीव्रता मोठी होती. अपघातानंतर बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ आणि आक्रोश पसरला.
या अपघातात इरशाद बी. रमजान मणियार (वय ६०, रा. जामनेर) आणि सखुबाई किरण माळी (वय ६५, रा. एरंडोल) या दोन महिलांचा मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. जखमींना मालेगाव येथील शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे. यातील काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.
जखमींमध्ये प्रणिता विनोद ततार (४७), राजेन्द्र जगन्नाथ ततार (६३), आशा राजेन्द्र ततार (५७) (सर्व रा. संगमेश्वर, मालेगाव), ऋतुजा शुभम सोनजे (२४, नाशिक), अरमान नजीम पिंजारी (३५, सोयगाव), गोकुळ रामदास भामरे (६५), सुनंदा गोकुळ भामरे (६०) (दोन्ही रा. नाशिक), सुहाना अझीसा (१९), निधा अझीसा (६६) (दोन्ही रा. मालेगाव) आणि रत्नाबाई नाना अहिरे (६०, टिंगरी, मालेगाव) यांचा समावेश आहे. या भीषण अपघातामुळे चाळीसगाव मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. याप्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, अपघातास नेमके कोण जबाबदार आहे, याचा शोध घेतला जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI