
जिल्ह्यातील ३.५३ लाख मतदार वगळले
अमरावती, 19 ऑगस्ट (हिं.स.) | विशेष सखोल पुनरीक्षणाची (एसआयआर) प्रक्रिया पूर्ण झाली असून अमरावती जिल्ह्यातील २५ लाख ४५ हजार ६७७ मतदारांचे डिजिटायझेशन झाले आहे. आठ मतदारसंघात १३ टक्के मतदार नवीन यादीतून वगळण्यात आले असून आता जिल्ह्यात २१ लाख ९२ हजार ६२१ मतदारयादीत समाविष्ट झाले आहेत. प्रारूप मतदारयादी येत्या २४ ऑगस्टला प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
एसआयआरनंतर बडनेरा मतदारसंघ सर्वाधिक तीन लाख १० हजार ९६४ मतदारांचा झाला आहे. जिल्ह्यात एक ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदारयाद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात आला आहे. या अंतर्गत गणना अर्जांचे वितरण व डिजिटायझेशनचे काम करण्यात आले असून ते शंभर टक्के पूर्ण झाल्याचे निवडणूक विभागाने म्हटले आहे. मतदारयादीतून तीन लाख ५३ हजार ५६ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. यामध्ये मृत, अनुपस्थित, कायम स्थलांतरित, इतर व दुबार मतदारांचा समावेश आहे. वगळण्यात आलेले सर्वाधिक ७५, ७८६ मतदार अमरावती विधानसभा मतदारसंघातील आहेत, तर मोर्शी मतदारसंघात २६ हजार ४६५ मतदारांचा समावेश आहे. एकूण मतदारांच्या तुलनेत वगळण्यात आलेल्या मतदारांचे प्रमाण १३.८७ टक्के आहे. विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत तयार झालेली प्रारूप मतदारयादी २४ ऑगस्टला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यापूर्वी १३ ऑगस्टला वगळण्यात आलेल्या मतदारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यावेळी तीन लाख ३० हजार मतदारांचा समावेश होता, त्यामध्ये वृद्धी झाली असून आता ही संख्या तीन लाख ५३ हजार ५६ वर गेली आहे. ज्या मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत, मात्र ते संबंधित मतदारसंघात आहेत त्यांना प्रारूपयादी प्रसिद्ध झाल्यानंतर नवीन मतदार नोंदणी करता येणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
मतदारसंघनिहाय मतदार
धामणगावरेल्वे : २, ६९, ४११
बडनेरा : ३, १०, ९६४
अमरावती : २, ९९, ६०७
तिवसा : २, ४७, २४०
दर्यापूर : २, ७५, ८५३
मेळघाट : २, ७३, ७६२
अचलपूर : २, ५३, ३०६
मोर्शी : २, ६२, ४७८
-------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी