
सोलापूर, 19 ऑगस्ट, (हिं.स.)। मतदार पुनरीक्षणाचे काम संपल्यानंतर आता राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने घेतला आहे. इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसह मुख्याध्यापकांना ५० तासांचे एआय प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
यासाठी ‘एआय साथी’ हा ऑनलाइन अभ्यासक्रम विकसित करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या ‘दीक्षा’ पोर्टलच्या माध्यमातून हा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे. प्रशिक्षणासाठी ३१ ऑगस्टपर्यंत नोंदणी करणे आणि ३० सप्टेंबरपर्यंत अभ्यासक्रम पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
शैक्षणिक आणि प्रशासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढत असल्याने शिक्षकांना एआयच्या योग्य, सुरक्षित आणि जबाबदार वापराचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अध्यापन अधिक परिणामकारक करण्याबरोबरच दैनंदिन कामकाजाची गुणवत्ता, अचूकता आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी या प्रशिक्षणाचा उपयोग होणार आहे.
कोटक एज्युकेशन फाउंडेशनच्या सहकार्याने ‘एआय साथी’ अभ्यासक्रम विकसित करण्यात आला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाशी शिक्षकांना जोडण्यासाठी आणि शिक्षण प्रक्रियेत एआयचा प्रभावी वापर करण्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वाचे मानले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड