जळगावहून हैदराबादपर्यंत आरोग्यसेवेचा नवा ‘पूल’
जळगाव, 19 ऑगस्ट, (हिं.स.) गंभीर आजारांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी मोठ्या शहरांकडे धाव घेणाऱ्या जळगाव, उत्तर महाराष्ट्र आणि परिसरातील रुग्णांसाठी आता हैदराबादची आरोग्यसेवा अधिक सुलभ करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. यशोदा रुग्णालय, हैदराबाद यांच्या वत
जळगावहून हैदराबादपर्यंत आरोग्यसेवेचा नवा ‘पूल’


जळगाव, 19 ऑगस्ट, (हिं.स.) गंभीर आजारांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी मोठ्या शहरांकडे धाव घेणाऱ्या जळगाव, उत्तर महाराष्ट्र आणि परिसरातील रुग्णांसाठी आता हैदराबादची आरोग्यसेवा अधिक सुलभ करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. यशोदा रुग्णालय, हैदराबाद यांच्या वतीने मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत अतिदक्षता उपचार, कृत्रिम श्वसन यंत्रणेची सुविधा, फुफ्फुस प्रत्यारोपण, फुफ्फुसविकार, मेंदूविषयक अतिदक्षता उपचार आणि अपघातग्रस्त रुग्णांसाठीच्या विशेष उपचारांची माहिती देण्यात आली. गंभीर रुग्णांसाठी केवळ अत्याधुनिक उपचार उपलब्ध असणे पुरेसे नसून, वेळेत योग्य रुग्णालयापर्यंत पोहोचणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे यावेळी तज्ज्ञांनी अधोरेखित केले.

क्रिटिकल केअर मेडिसिन विभागाचे वरिष्ठ सल्लागार व विभागप्रमुख डॉ. कलाधर एस. यांनी गंभीर आजारांवरील उपचारांबाबत मार्गदर्शन केले. गंभीर श्वसनविकारामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात कमी झालेल्या रुग्णांवरील उपचार, अत्याधुनिक कृत्रिम फुफ्फुस यंत्रणा, दूरस्थ अतिदक्षता विभागाच्या माध्यमातून तज्ज्ञांचे मार्गदर्शन, मेंदूविषयक अतिदक्षता उपचार तसेच अपघातग्रस्त रुग्णांवरील उपचार याबाबत त्यांनी माहिती दिली. गंभीर रुग्णाच्या बाबतीत उपचार सुरू होण्यास होणारा प्रत्येक विलंब महत्त्वाचा ठरू शकतो. त्यामुळे रुग्णाची स्थिती बिघडण्यापूर्वी त्याला योग्य तज्ज्ञ उपचार मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फुफ्फुस, अतिदक्षता आणि झोपविकार तज्ज्ञ डॉ. प्रणय साई चंद्रगिरी यांनी फुफ्फुसांशी संबंधित विविध आजारांवर प्रकाश टाकला. फुफ्फुसांच्या ऊतींमध्ये होणारे बदल, झोपेशी संबंधित विकार, क्षयरोग, फुफ्फुसाचा कर्करोग तसेच श्वासनलिकेद्वारे निदान व उपचार करण्याच्या विविध पद्धतींबाबत त्यांनी माहिती दिली.

फुफ्फुसांचे आजार सुरुवातीच्या टप्प्यात ओळखले गेल्यास उपचार अधिक परिणामकारक ठरू शकतात. त्यामुळे लक्षणांकडे दुर्लक्ष न करता योग्य वेळी तपासणी करणे आणि गरज भासल्यास तज्ज्ञ रुग्णालयात रुग्णाला पाठविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. उपचारासाठी अनेक दिवस हैदराबादमध्ये राहावे लागणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवासाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. स्वयंपाकघराच्या सुविधेसह जवळच्या निवासस्थानी 750 रुपयांपासून राहण्याची सुविधा उपलब्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले. रुग्णालयात उपचार सुरू असताना नातेवाईकांना राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करणे हे अनेकदा मोठे आव्हान असते. त्यामुळे उपचारासोबतच या मूलभूत गरजांचाही विचार करण्यात आला आहे. परराज्यात उपचार घेताना भाषेची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी मराठी व हिंदी भाषिक स्वतंत्र समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

रुग्णालयात दाखल होण्यापासून उपचार पूर्ण होऊन घरी परतण्यापर्यंत रुग्ण व नातेवाईकांना हे समन्वयक मार्गदर्शन करणार आहेत. रुग्णाची प्रकृती आणि वैद्यकीय गरज लक्षात घेऊन रेल्वे किंवा विमानाच्या प्रवासाची व्यवस्था करण्यासाठीही मदत केली जाणार आहे. त्याचबरोबर हवाई रुग्णवाहिका, रेल्वे रुग्णवाहिका आणि रस्त्यावरील रुग्णवाहिका यांचा समन्वय साधण्याची सुविधाही उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. जळगाव आणि उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना अत्याधुनिक उपचारांसाठी मोठ्या शहरांकडे जावे लागते. मात्र, मोठ्या शहरातील उपचारांइतकाच प्रवास, निवास, भाषा आणि रुग्णालयातील प्रक्रियेचा ताणही कुटुंबीयांवर असतो. याच अडचणी लक्षात घेऊन हैदराबादमधील विशेष उपचार सुविधा जळगाव व उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांसाठी अधिक सुलभ करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande