
रायगड, 19 ऑगस्ट (हिं.स.)। : महाराष्ट्र संशोधन, उन्नती प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेच्या वतीने ‘अमृत पेठ – थेट स्वदेशी बाजारपेठ’ उपक्रमाचे आयोजन महाड येथील श्री वीरेश्वर मंदिर सभागृहात करण्यात आले आहे. शुक्रवार, २१ ऑगस्ट ते रविवार, २३ ऑगस्ट २०२६ या कालावधीत सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत ही बाजारपेठ नागरिकांसाठी खुली राहणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी सहकुटुंब या बाजारपेठेला भेट देऊन नवउद्योजकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन रायगड जिल्हा व्यवस्थापक शैलेश मराठे यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. महिलांचे सक्षमीकरण, लघुउद्योगांना चालना आणि स्वयंरोजगार निर्मिती यासाठी लक्षित गटातील लाभार्थ्यांना विविध व्यवसायांचे प्रशिक्षण देण्यात येते. या प्रशिक्षणातून तयार होणाऱ्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे, विक्री कौशल्य वाढविणे आणि नवउद्योजकांना ग्राहकांशी थेट जोडणे, या उद्देशाने ‘अमृत पेठ’चे आयोजन करण्यात आले आहे.
या थेट स्वदेशी बाजारपेठेत स्थानिक लघुउद्योजक व प्रशिक्षण घेतलेल्या लाभार्थ्यांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांची विक्री करण्यात येणार आहे. नागरिकांना स्थानिक पातळीवर तयार झालेली उत्पादने खरेदी करण्याची संधी मिळणार असून, त्यातून नवउद्योजकांना आर्थिक पाठबळ मिळणार आहे.
बाजारपेठेदरम्यान दररोज तीन लकी ड्रॉ काढण्यात येणार असून, वामन हरी पेठे यांच्या वतीने विजेत्यांना भेटवस्तू देण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी रायगड जिल्हा व्यवस्थापक शैलेश मराठे (९११२२२८७५९, ९४२३८९२१८२), मंगेश ढेबे (८१४९५५२१४३), विक्रांत बुटाला (९६२३८१११२९), ममता मेहता (८०१०३३२८६४) आणि केदार पुरोहित (९८९०४१४९०) यांच्याशी संपर्क साधावा.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)