अंबाजोगाईसाठी प्रधानमंत्री आवास योजनेतील आणखी ६६ घरकुलांना मंजुरी
बीड, १९ ऑगस्ट (हिं.स.)। अंबाजोगाई शहरातील सर्वसामान्य नागरिकांना हक्काचे घर मिळावे, यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आणखी ६६ घरकुलांना अधिकृत मंजुरी मिळाली आहे. नवी दिल्ली येथे ६ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या केंद्रीय मंजुरी व संनियंत्रण समितीच्या
घरकुल मंजुरी


बीड, १९ ऑगस्ट (हिं.स.)। अंबाजोगाई शहरातील सर्वसामान्य नागरिकांना हक्काचे घर मिळावे, यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आणखी ६६ घरकुलांना अधिकृत मंजुरी मिळाली आहे. नवी दिल्ली येथे ६ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या केंद्रीय मंजुरी व संनियंत्रण समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून, केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने यासंदर्भातील अधिकृत कार्यालयीन ज्ञापन जारी केले आहे.

शहरातील गरजू कुटुंबांना घरकुलांचा लाभ मिळावा यासाठी नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी शासनाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे ही मंजुरी मिळाल्याचे सांगण्यात आले. यामुळे अंबाजोगाईतील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

नगराध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर कार्यकाळाच्या सुरुवातीलाच नंदकिशोर मुंदडा यांनी ७१ घरकुलांना मंजुरी मिळवून दिली होती. त्यानंतर आता आणखी ६६ घरकुलांना मंजुरी मिळवून देण्यात त्यांना यश आले आहे. या दोन्ही टप्प्यांत मंजूर झालेल्या घरकुलांमुळे शहरातील अनेक गरीब व गरजू कुटुंबांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार होणार आहे.

घरकुल योजनेच्या प्रस्तावापासून अंतिम मंजुरीपर्यंत प्रशासकीय स्तरावर जातीने लक्ष घालून पाठपुरावा करण्यात आला. शहराच्या सर्वांगीण विकासासोबतच तळागाळातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यावर भर देत प्रत्यक्ष कृतीतून सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या कामासाठी शासन स्तरावर आमदार नमिता मुंदडा यांचे मोठे सहकार्य लाभत असल्याचेही नमूद करण्यात आले. घरकुलांना मंजुरी मिळाल्याबद्दल नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहनिर्माण मंत्री मनोहरलाल खट्टर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, मंत्री पंकजाताई मुंडे, गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर आणि आमदार नमिता मुंदडा यांचे आभार मानले आहेत.

-----------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande