

अमरावती, 19 ऑगस्ट (हिं.स.) : अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढीव म ालमत्ता कराच्या प्रस्तावाला स्थगिती देऊन नागरिकांची दिशाभूल करण्यात आली आणि निवडणुका होताच ही स्थगिती उठविण्यात आली, असा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे. भाजपने अमरावतीतील सुमारे तीन लाख मालमत्ताधारकांचा विश्वासघात केल्याचा आरोप काँग्रेसचे माजी नगरसेवक मुन्ना राठोड व जिल्हा औद्योगिक सेलचे अध्यक्ष समीर जवंजाळ यांनी केला.
सन २०२३-२४ मध्ये महापालिका प्रशासनाने मालमत्तांचे सर्वेक्षण व मूल्यांकन करून मालमत्ता करात मोठी वाढ प्रस्तावित केली होती. या वाढीमुळे काही प्रकरणांत पूर्वीचा एक हजार रुपयांचा कर थेट दहा हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. या निर्णयाविरोधात नागरिक सुरक्षा कृती समिती तसेच काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले होते. मालमत्ताधारकांनी हरकती नोंदवूनही त्यांना योग्य पद्धतीने सुनावणीची संधी देण्यात आली नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.मालमत्तांच्या सर्वेक्षणाचे कंत्राट देताना निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. संबंधित स्थापत्य कंपनीचा करार रद्द करून संपूर्ण प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, १० ऑगस्ट रोजी शासनाने वाढीव मालमत्ता करावरील स्थगिती उठविल्याने आता नागरिकांवर पुन्हा करवाढ लादण्याचा मार्ग मोकळा झाल्याचा दावा मुन्ना राठोड व समीर जवंजाळ यांनी केला. येत्या २० ऑगस्ट रोजी होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत वाढीव मालमत्ता कराचा प्रस्ताव विखंडित करून शासनाकडे पाठवावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. अन्यथा नागरिकांच्या हितासांठी तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मुन्ना राठोड व समीर जवंजाळ यांनी दिला.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी