पीकविम्यासाठी बैलगाडी मोर्चा; पाचव्या दिवशी आंदोलनाला शेतकऱ्यांचा जोरदार प्रतिसाद
बीड, 19 ऑगस्ट (हिं.स.)। पीकविमा भरपाईच्या मागणीसाठी जागर प्रतिष्ठानचे विशाल जाधव यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या उपोषणाच्या पाचव्या दिवशी शेतकऱ्यांनी माजलगाव शहरातून बैलगाडी मोर्चा काढत प्रशासनाचे लक्ष वेधले. मोठ्या संख्येने शेतकरी या मोर्चात सह
आंदोलन


बीड, 19 ऑगस्ट (हिं.स.)। पीकविमा भरपाईच्या मागणीसाठी जागर प्रतिष्ठानचे विशाल जाधव यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या उपोषणाच्या पाचव्या दिवशी शेतकऱ्यांनी माजलगाव शहरातून बैलगाडी मोर्चा काढत प्रशासनाचे लक्ष वेधले. मोठ्या संख्येने शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काढण्यात आलेला बैलगाडी मोर्चा माजलगाव शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर पोहोचला. यावेळी शेतकऱ्यांनी पीकविमा प्रश्नावर प्रशासनाने तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली.

मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर उपविभागीय अधिकारी गौरव इंगोले यांनी आंदोलकांशी चर्चा केली. पीकविमा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांच्या मागण्या ऐकून घेत त्यांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याशी चर्चा करण्यासाठी वेळ मागितली.

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी आज सायंकाळी साडेसहा वाजता पीकविमा आंदोलनाच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करण्याची तयारी दर्शविल्याची माहिती आंदोलकांना देण्यात आली. त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पुढील भूमिकेकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

पीकविमा भरपाईचा प्रश्न मार्गी लावून शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. प्रशासनासोबत होणाऱ्या चर्चेत ठोस निर्णय न झाल्यास कृषी मंत्री दत्ता भरणे व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला

पाचव्या दिवशी बैलगाडी मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी एकजूट दाखवत पीकविम्याच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले असून, आता जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे माजलगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande