
अमरावती, 19 ऑगस्ट (हिं.स.)।
शहरातील नायरा पेट्रोल पंप परिसरातील एका सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या बंद घरात चोरट्यांनी धाडसी चोरी करून सुमारे ११ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.. चोरट्यांनी घरातून ८० ग्रॅम सोन्याचे दागिने, २०० ग्रॅम चांदीचे दागिने आणि १ लाख ८० हजार रुपयांची रोकड चोरून नेली.
मोहम्मद सादिक मोहम्मद उमर असे सेवानिवृत्त न्यायाधीशांचे नाव आहे. ते कुटुंबीयांसह नागपूर येथे वास्तव्यास असून, परतवाड्यातही त्यांचे घर आहे. आठवड्यातून एक-दोन दिवस ते परतवाड्यातील घरी येत असतात. दरम्यान, मंगळवारी सकाळी घरी आल्यानंतर त्यांना घराचा कडी-कोंडा तुटलेला दिसला. घरात जाऊन पाहणी केली असता चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
चार ते पाच चोरट्यांचा सहभाग?
चोरी मध्यरात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास झाली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेत चार ते पाच चोरट्यांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. परिसरातील काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून, त्याच्या आधारे चोरट्यांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.घटनेची माहिती मिळताच ठाणेदार अजय आकरे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलिस निरीक्षक अशोक लांडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.
------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी