
चंद्रपूर, 19 ऑगस्ट (हिं.स.)। चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत वापर तसेच अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्यात आली. शहरातील विविध भागांत करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये अनधिकृत व्यावसायिक वापरास प्रतिबंध करण्यासह महानगरपालिकेच्या मालकीच्या खुल्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यात आले.
-जिल्हा स्टेडियम परिसरातील मँगो ट्री रेसिडेंटल एरियामध्ये कारवाई
जिल्हा स्टेडियमजवळील मँगो ट्री रेसिडेंटल एरियामध्ये निवासी वापरासाठी असलेल्या ठिकाणी कमर्शिअल हॉटेलचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले. सदर अनधिकृत व्यावसायिक वापराच्या अनुषंगाने चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने संबंधित ठिकाणी कारवाई करून ते सील करण्यात आले.
-महानगरपालिकेच्या हस्तांतरित ओपन स्पेसवरील अतिक्रमण हटविले
महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आलेल्या ओपन स्पेसमध्ये अतिक्रमण करण्यात आले असल्याचे निदर्शनास आले. सदर अतिक्रमणाविरोधात महानगरपालिकेच्या पथकाने कारवाई करीत अतिक्रमण हटविले व जागा अतिक्रमणमुक्त करण्यात आली.
-हवेली गार्डन येथील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटविले
हवेली गार्डन परिसरातील मुख्य रस्त्यावर करण्यात आलेल्या अतिक्रमणाविरोधातही महानगरपालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान रस्त्यावरील अतिक्रमण हटवून वाहतुकीसाठी जागा मोकळी करण्यात आली.
चंद्रपूर शहरातील सार्वजनिक जागा, रस्ते व महानगरपालिकेच्या मालकीच्या जागांचा अनधिकृत वापर तसेच अतिक्रमणास प्रतिबंध करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने नियमानुसार कारवाई करण्यात येत आहे. शहरातील सार्वजनिक मालमत्ता व जागांचे संरक्षण करण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सातत्याने करण्यात येणार असल्याचे महानगरपालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव