
चंद्रपूर, 19 ऑगस्ट (हिं.स.)।गोंडवाना विद्यापीठाने 'एन.ई.पी. कनेक्ट' या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना विद्यापीठ प्रशासनाशी थेट संवाद साधण्यासाठी तसेच गोंडवाना विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयांतील व पदव्युत्तर शैक्षणिक विभागातील विद्यार्थ्यांच्या संदर्भातील प्रश्नांच्या उपाययोजनांबाबत कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे आणि प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांच्या उपस्थितीत विविध महाविद्यालयांमध्ये नुकताच विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
त्याअनुषंगाने महाविद्यालयाचे प्राचार्य, संस्थापक, प्राध्यापक आणि विद्यार्थी यांचेशी संवाद साधत समस्यांच्या जाणीवेतून ठोस उपाययोजना करण्याचा कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांनी मानस व्यक्त केला. गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने नुकताच नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय, ब्रह्मपुरी येथे विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, संस्थापकांचे प्रतिनिधी, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी आणि विद्यार्थी विकास अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत शैक्षणिक वेळापत्रक, इंटर्नशिप, परीक्षेसंदर्भातील अडचणी, परीक्षा पद्धती तसेच विद्यार्थ्यांची उपस्थिती याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. महाविद्यालयीन स्तरावरील विविध शैक्षणिक अडचणी जाणून घेऊन त्यावर प्रभावी उपाययोजना करण्याबाबत यावेळी विचारविनिमय करण्यात आला.
स्पर्धा परीक्षा आणि इतर परीक्षांमधील गैरप्रकार व पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जंतरमंतर येथे झालेल्या आंदोलनाबाबत विद्यार्थ्यांची मतेही जाणून घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी अशा गैरप्रकारांविरोधातील आंदोलन योग्य असल्याचे मत व्यक्त केले.
परीक्षांचे निकाल लवकर जाहीर करणे, गुणपत्रिका वेळेत उपलब्ध करून देणे तसेच इतर शैक्षणिक प्रश्नांबाबत विद्यार्थ्यांनी मांडलेल्या समस्यांवर कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव