
छत्रपती संभाजीनगर, 19 ऑगस्ट (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर शहरातील सार्वजनिक ठिकाणांचे विद्रुपीकरण करणाऱ्या अनधिकृत बॅनर, पोस्टर, माहिती फलक, भिंतीपत्रके, पाम्प्लेट आदींविरोधात छत्रपती संभाजीनगर महापालिकेने आता आक्रमक भूमिका घेतली असून, हडको टीव्ही सेंटर परिसरात महापालिकेच्या पथकांनी धडक मोहीम राबवून एकाच वेळी मोठी दंडात्मक कारवाई केली. या कारवाईत दीड लाख रुपयांहून अधिक दंड ठोठावण्यात आला आहे.
महानगरपालिका आयुक्त श्री. अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपायुक्त श्री. नंदकिशोर भोंबे यांच्या नियोजनानुसार ही विशेष मोहीम राबविण्यात आली. नागरिक मित्र पथक तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या पथकांनी एकाच वेळी हडको टीव्ही सेंटर परिसरातील विविध व्यावसायिक भागांमध्ये पाहणी करून अनधिकृत जाहिरात साहित्य लावणाऱ्या आस्थापनांवर कारवाई केली.
१०० हून अधिक आस्थापनांची तपासणी
हडको टीव्ही सेंटर हा शहरातील महत्त्वाचा व्यापारी व व्यावसायिक परिसर असून या भागात विविध प्रकारच्या आस्थापनांची मोठी संख्या आहे. मोहिमेदरम्यान १०० पेक्षा अधिक व्यावसायिक आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये अनधिकृत बॅनर, पोस्टर, माहिती फलक, भिंतीपत्रके, पाम्प्लेट तसेच इतर जाहिरात साहित्य आढळून आलेल्या २० आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
कारवाईदरम्यान संबंधित आस्थापनांच्या उल्लंघनाचे स्वरूप व प्रमाण लक्षात घेऊन सुमारे ५ हजार रुपयांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंत विविध रकमेचा दंड आकारण्यात आला. सर्व कारवायांमधून एकत्रितपणे 1.50 लाख रुपयांपेक्षा अधिक दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे.
महानगरपालिकेच्या या अचानक झालेल्या कारवाईमुळे परिसरातील व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली. सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतपणे जाहिरातबाजी करण्यापूर्वी संबंधित व्यावसायिकांनी महानगरपालिकेचे नियम व परवानगीची प्रक्रिया यांचे पालन करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
--------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis