अमरावतीत २७ सप्टेंबरला भव्य शेतकरी मेळावा; मुख्यमंत्र्यांचा सन्मान होणार
अमरावती, १९ ऑगस्ट (हिं.स.) : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजनेच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, अमरावतीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सन्मानार्थ भव्
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 27 सप्टेंबर ला अमरावतीत


अमरावती, १९ ऑगस्ट (हिं.स.) : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजनेच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, अमरावतीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सन्मानार्थ भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा २७ सप्टेंबर रोजी अमरावती येथे होणार असून, जिल्ह्यातील सुमारे १० हजार कर्जमुक्त शेतकऱ्यांना मेळाव्यासाठी निमंत्रित करण्यात येणार आहे.

या मेळाव्याचे निमंत्रण देण्यासाठी भाजपाच्या शिष्टमंडळाने मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राज्यसभा सदस्य खासदार डॉ. अनिल बोंडे, विधानपरिषद सदस्य आमदार प्रवीण पोटे पाटील, भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा धामणगाव रेल्वेचे आमदार प्रतापदादा अडसड, तिवसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश वानखडे, महापौर श्रीचंद तेजवानी, माजी प्रदेश सचिव जयंत डेहणकर, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, मनपा सभागृह नेते चेतन गावंडे आणि जिल्हा सरचिटणीस नितीन गुडधे पाटील यांचा शिष्टमंडळात समावेश होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मेळाव्याचे निमंत्रण स्वीकारले.

कर्जमुक्त शेतकऱ्यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांचा सन्मान

अमरावती जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजनेचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना लाभ झाल्याचा दावा भाजपाकडून करण्यात आला आहे. या कर्जमुक्त शेतकऱ्यांच्या उपस्थितीत शेतकरी प्रतिनिधींच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात शेतकरी हिताच्या विविध योजना राबविण्यात आल्याचे भाजपाकडून सांगण्यात आले. जलसिंचन योजना, शेतकरी वीजबिल माफी तसेच सौर ऊर्जा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी शासनाने प्रयत्न केल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून मेळाव्याची तयारी

मेळावा यशस्वी करण्यासाठी आमदार प्रवीण तायडे, उमेश यावलकर आणि केबलराम काळे यांच्यासह भाजपाचे सर्व जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी संयुक्तपणे प्रयत्न करणार आहेत.

दरम्यान, श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पर्वावर भाजपाच्या वतीने अमरावती येथे आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य ‘गोविंदा आला रे’ दहीहंडी स्पर्धेचे निमंत्रणही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारले आहे. त्यामुळे आगामी काळात अमरावतीत भाजपाच्या वतीने दोन मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे.

------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande