
लातूर, 19 ऑगस्ट (हिं.स.)। माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त यावर्षीपासून २१ ऑगस्ट रोजी 'जलसंधारण दिन' साजरा केला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने २१ ऑगस्ट २०२६ रोजी लातूर येथे ‘महा वॉकेथॉन २०२६ - वॉक फॉर वॉटर’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वॉकेथॉनमध्ये लातूर जिल्ह्यातील सर्व नागरिक, शासकीय व निमशासकीय अधिकारी, कर्मचारी, तरुण, विद्यार्थी, एनसीसी व एनएसएसचे स्वयंसेवक, क्रीडापटू, डॉक्टर्स, उद्योजक, व्यावसायिक, महिला आणि सर्व स्वयंसेवी संस्थांनी क्यूआर कोडच्या माध्यमातून ऑनलाईन नोंदणी करून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले आहे.
‘सेव्ह सॉईल, सेव्ह वॉटर, सिक्युर टुमारो’ ही या वॉकेथॉनची मुख्य संकल्पना असून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हा मोलाचा संदेश घेऊन सर्वजण एकत्र चालणार आहेत. ही वॉकेथॉन २१ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता जिल्हा परिषद प्रांगणातून सुरू होऊन नवीन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाईल, तिथे पोहोचल्यानंतर सर्व सहभागी नागरिक मृद व जलसंधारणाची सामूहिक शपथ घेतील. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक नागरिकाला ई-प्रमाणपत्र दिले जाणार असून जिल्हास्तरावर प्रथम येणाऱ्या १० विजेत्यांचा विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येईल. तरी सर्वांनी २१ ऑगस्टला एकत्र येऊन जलसंवर्धनाचा संदेश घराघरांत पोहोचवावा आणि जलसमृद्ध लातूर घडवण्यासाठी या महा वॉकेथॉनमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis