कोंबडी खाद्याच्या गोण्यांमध्ये रेशनचा माल
जळगाव , 19 ऑगस्ट (हिं.स.) कोंबड्यांच्या खाद्याचा छाप असलेल्या गोण्यांमध्ये शासकीय रेशनचा गहू आणि तांदूळ लपवून काळ्या बाजारात विक्रीसाठी वाहतूक करण्याचा प्रकार उघडकीस आला असून पारोळा पोलिसांनी कारवाई करत ७३.५४ क्विंटल धान्य आणि मालवाहू ट्रक असा एकू
कोंबडी खाद्याच्या गोण्यांमध्ये रेशनचा माल


जळगाव , 19 ऑगस्ट (हिं.स.) कोंबड्यांच्या खाद्याचा छाप असलेल्या गोण्यांमध्ये शासकीय रेशनचा गहू आणि तांदूळ लपवून काळ्या बाजारात विक्रीसाठी वाहतूक करण्याचा प्रकार उघडकीस आला असून पारोळा पोलिसांनी कारवाई करत ७३.५४ क्विंटल धान्य आणि मालवाहू ट्रक असा एकूण ७ लाख १२ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी धान्याचा मालक सुभाष विठ्ठल वाणी (६१, रा. पारोळा) आणि फरार ट्रक चालकाविरुद्ध पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे रेशनच्या धान्याची काळ्या बाजारात होणारी तस्करी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

पारोळा शहरातील सप्तर्षी मंगल कार्यालयासमोर आणि भाग्यश्री टोल कार्यालयाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी परिसरात पाहणी केली असता टाटा कंपनीचा केशरी रंगाचा मालवाहू ट्रक (एमएच १६ एई ६८६६) आढळून आला. पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये कोंबड्यांच्या खाद्याचे लेबल असलेल्या गोण्यांमध्ये गहू आणि तांदूळ भरलेला आढळून आला. ट्रकमध्ये १६२ गोण्या असल्याचे तपासात समोर आले. जप्त करण्यात आलेल्या धान्याची किंमत २ लाख १२ हजार ९७० रुपये, तर ट्रकची किंमत सुमारे ५ लाख रुपये आहे. संशयितांनी कोणताही वैध परवाना नसताना प्रशासनाची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने कोंबड्यांच्या खाद्याचे लेबल असलेल्या गोण्यांचा वापर केल्याचा पोलिसांचा प्राथमिक निष्कर्ष आहे. सुभाष वाणी आणि ट्रक चालकाने संगनमत करून रेशनचा हा साठा काळ्या बाजारात विक्रीसाठी वाहतूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पारोळा पोलीस शिपाई भूषण राजाराम पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande