कल्याण-शीळ रस्ता भूसंपादनग्रस्त शेतकऱ्यांना १३८.४५ कोटींचा मोबदला; भूमिपुत्र आनंदित
डोंबिवली, 19 ऑगस्ट (हिं.स.)। कल्याण-शीळ रस्त्याच्या रुंदीकरणासाठी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणीला अखेर न्याय मिळाल्याने बाधित भूमिपुत्रांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. शिवसेना डोंबिवली मध्यवर्ती कार्यालय परिसरात भूमिपुत्र एकत्र आले
Ph02


Ph01


डोंबिवली, 19 ऑगस्ट (हिं.स.)।

कल्याण-शीळ रस्त्याच्या रुंदीकरणासाठी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणीला अखेर न्याय मिळाल्याने बाधित भूमिपुत्रांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. शिवसेना डोंबिवली मध्यवर्ती कार्यालय परिसरात भूमिपुत्र एकत्र आले आणि निर्णयाचा जल्लोष करत आनंद व्यक्त केला. पहिल्या टप्प्यात १३८.४५ कोटी रुपयांचा मोबदला देण्याचा निर्णय झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

एमएमआरडीए येथे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कल्याण-शीळ रस्त्यासाठी भूसंपादन झालेल्या जमिनींच्या मोबदल्याचा प्रश्न मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्या टप्प्यात १३८.४५ कोटी रुपयांचा मोबदला देण्यात येणार असून, दुसऱ्या टप्प्यातील रक्कमही महिनाभरात देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

आमदार राजेश मोरे यांनी या निर्णयाचे स्वागत करताना हा भूमिपुत्रांसाठी आनंदाचा दिवस असल्याचे म्हटले. कल्याण-शीळ रस्त्याच्या कामासाठी गेल्या ४० ते ५० वर्षांपासून शेतकऱ्यांच्या जमिनी रस्त्यात गेल्या होत्या. मात्र, त्यांना मोबदला मिळावा यासाठी वर्षानुवर्षे आंदोलने आणि पाठपुरावा सुरू होता. अखेर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत भूमिपुत्रांच्या हिताचा निर्णय घेण्यात आला असे मोरे यांनी सांगितले.

या निर्णयाबद्दल आमदार मोरे यांनी एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आभार मानत अभिनंदन केले. भूमिपुत्रांना न्याय देण्याचे काम या निर्णयामुळे झाले असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान गजानन पाटील यांनीही या निर्णयाचे स्वागत केले. भिवंडी-कल्याण-शीळफाटा रस्त्यासाठी प्रलंबित असलेल्या सुमारे १७ एकर जमिनीच्या मोबदल्याचा प्रश्न बैठकीत चर्चेला आला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीए प्रशासनाला संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादन करून प्रकल्पाचे काम पुढे नेण्याचे स्पष्ट निर्देश दिल्याचे पाटील यांनी सांगितले.

दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मागणीला न्याय मिळाल्याने बाधित भूमिपुत्रांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. शिवसेना डोंबिवली मध्यवर्ती कार्यालय परिसरात एकत्र येत भूमिपुत्रांनी जल्लोष केला. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर मिळालेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

डोंबिवली मध्यवर्ती कार्यालयात या विषयावर पत्रकार परिषद घेण्यात आली होती. यावेळी आमदार राजेश मोरे, गजानन पाटील, बाबाजी पाटील, राजेश कदम, प्रकाश म्हात्रे, मुकेश पाटील, अनिल म्हात्रे जोशी, गजानन व्यापारी, सतीश मोडक यांच्यासह बाधित भूमिपुत्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi


 rajesh pande