
छत्रपती संभाजीनगर, 19 ऑगस्ट (हिं.स.)।
- कुलगुरु डॉ. संजीव सोनवणे समारंभाचे प्रमुख पाहुणे
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६८ वा वर्धापनदिन येत्या २३ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. या सोहळयासाठी नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगरु डॉ. संजीव सोनवणे यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची स्थापना तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या हस्ते २३ ऑगस्ट १९५८ रोजी 'मराठवाडा विद्यापीठ' या नावाने करण्यात आली. तर १४ जानेवारी १९९४ रोजी विद्यापीठाचा 'डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ' असा नामविस्तार करण्यात आला. यंदाच्या ६८ व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण, जीवन साधना पुरस्कार वितरण, गुणवंताना पारितोषिक वितरण आदी कार्यक्रम होणार आहेत. मुख्य इमारतींसमोरील हिरवळीवर सकाळी ९ः०० वाजता विद्यापीठ ध्वज फडविण्यात येईल. यानंतर वर्धापनदिनाचा मुख्य सोहळा सकाळी १० वाजता विद्यापीठ नाट्यगृहात होईल. यावेळी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.संजीव सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कुलगुरू डॉ विजय फुलारी अध्यस्थान भूषविणार आहेत. यावेळी ज्येष्ठ सनदी अधिकारी भास्कर शंकरराव मुंढे यांना जीवनसाधना पुरस्काराने सन्मानित करणार येणार आहे. कार्यक्रमास प्रकुलगुरू डॉ.प्रवीण वक्ते, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.गजानन सानप, प्राचार्य डॉ.भारत खंदारे यांची प्रमुख उपस्थिती राहील. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर यांनी केले आहे.
*माजी आयुक्त भास्कर मुंढे यांना जीवनसाधना पुरस्कार*
विद्यापीठ दिन व उपपरिसर वर्धापन दिन अशा दोन्ही दिवशी जीवनसाधना पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. यंदाच्या पुरस्कार निवडीसाठी कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांनी तज्ज्ञांची शोध समिती स्थापन केली. सदर समितीच्या शिफारशीवरुन विद्यापीठाचा मुख्य जीवनसाधना पुरस्कार ज्येष्ठ सनदी अधिकारी भास्कर शंकरराव मुंढे यांना जाहीर करण्यात आला आहे. श्री. मुंढे हे माजी विभागीय आयुक्त असून ४ जून २०१० ते सप्टेंबर २०१० या काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरूपदही त्यांनी भूषविले आहे. त्यांच्या संपूर्ण कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis