
छत्रपती संभाजीनगर, १९ ऑगस्ट (हिं.स.)। जालना जिल्ह्यातील विविध विकासकामांना गती देण्यासाठी शिवसेनेचे संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांत एकनाथराव शिंदे आणि शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांच्यात मुंबई येथे महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत जिल्ह्यातील विविध विकासकामे, प्रलंबित प्रश्न तसेच आगामी काळातील विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
जालना जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा, शहर व ग्रामीण भागातील विकासकामे, नागरिकांच्या समस्या तसेच मतदारसंघातील विविध प्रश्न आमदार अर्जुनराव खोतकर यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासमोर मांडले. जिल्ह्यातील विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबरोबरच प्रशासकीय स्तरावर सहकार्य मिळावे, याबाबतही बैठकीत चर्चा झाली.
जिल्ह्याच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात, अशी अपेक्षा आमदार खोतकर यांनी व्यक्त केली. नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि स्थानिक पातळीवरील प्रश्न प्राधान्याने सोडविण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.
या बैठकीमुळे जालना जिल्ह्यातील आगामी विकासकामांना अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून भरीव सहकार्य मिळवून देण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहू, असा विश्वास आमदार अर्जुनराव खोतकर यांनी व्यक्त केला.
बैठकीप्रसंगी शिवसेना संपर्कप्रमुख पंडितदादा भुतेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे, मनपा विरोधी पक्षनेते कमलेश खरे, नगरसेविका दर्शनाताई खोतकर, नगरसेवक दुर्गेश कठोटीवाले, किशोर पांगारकर, संजय डुकरे पाटील, निखिल पगारे, अमोल ठाकूर, विजय जाधव, दिनेश भगत, दीपक राठोड, योगेश भगत, सगीर पैलवान, अश्विन आंबेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
--------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis