'फार्म टू फॉरेन' मोहिमेतून महाराष्ट्रातील कापड उद्योगाला मिळणार जागतिक झळाळी - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, १९ ऑगस्ट (हिं.स.) : महाराष्ट्राच्या मातीत पिकलेला कापूस आणि त्यापासून तयार उत्पादने आता थेट परदेशातील मॉलमध्ये झळकरणार आहेत. कापूस उत्पादनापासून ते जागतिक फॅशन बाजारपेठेपर्यंतची साखळी अधिक बळकट करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून, ''फार्म टू
एकनाथ शिंदे


मुंबई, १९ ऑगस्ट (हिं.स.) : महाराष्ट्राच्या मातीत पिकलेला कापूस आणि त्यापासून तयार उत्पादने आता थेट परदेशातील मॉलमध्ये झळकरणार आहेत. कापूस उत्पादनापासून ते जागतिक फॅशन बाजारपेठेपर्यंतची साखळी अधिक बळकट करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून, 'फार्म टू फॉरेन' संकल्पनेद्वारे महाराष्ट्र जागतिक एक्सपोर्ट हब होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला.

जिओ वर्ल्ड सेंटर येथे असोचेम आयोजित 'फार्म टू फॉरेन कॉन्क्लेव्ह २०२६' मध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी असोचॅम महाराष्ट्र राज्य परिषदेचे अध्यक्ष मिलिंद हर्डीकर यांच्यासह अजय अरोरा, कार्तिकेय धंडा, वृंदा मनोहर देसाई, चिन्मयी देऊळगावकर, उद्योजक, धोरणकर्ते आणि जागतिक तज्ज्ञ उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'विकसित भारत @२०४७' च्या स्वप्नाला बळ देण्यासाठी राज्य सरकार ' फाइव एफ' व्हिजनवर काम करत आहे. यामध्ये फार्म ते फायबर, फायबर ते फॅक्टरी, फॅक्टरी ते फॅशन आणि फॅशन ते फॉरेन असा प्रवास निश्चित करण्यात आला आहे. आपल्या शेतातील कापूस, रेशीम, जूट आणि फळांचे जागतिक ब्रँडिंग करणे, हे आमचे उद्दिष्ट असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

महाराष्ट्राची 'टेक्सटाईल हब' म्हणून ओळख तसेच मुंबईला आर्थिक राजधानीचा दर्जा मिळवून देण्यात कापड गिरण्यांचा मोठा वाटा होता. याच ऐतिहासिक वारशाला पुढे नेत, नागपूरचा पीएम मित्रा पार्क आणि अमरावती टेक्स्टाईल क्लस्टर राज्याच्या अर्थव्यवस्थेला नवी गती देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, केवळ उत्पादन वाढवणे पुरेसे नाही, तर उत्पादन 'ग्रीन', 'डिजिटल' आणि 'पारदर्शक' असणे गरजेचे आहे. इचलकरंजी, सोलापूर, भिवंडीसह राज्यातील विविध भागांत 'रेडीमेड गारमेंट क्लस्टर्स' उभारले जात आहेत. तसेच, 'लाडकी बहीण' योजनेच्या माध्यमातून महिलांना आधुनिक शिलाई प्रशिक्षणाशी जोडून त्यांना स्वयंपूर्ण बनवण्याचे काम सुरू असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या पैठणी, कोल्हापुरी चप्पलयांसारख्या पारंपरिक उत्पादनांच्या जागतिक विस्तारासाठी सरकार विशेष प्रयत्नशील आहे. भायखळा येथील ऐतिहासिक इंडिया युनायटेड मिलच्या जागेवर 'टेक्स्टाईल, क्राफ्ट अँड कल्चरल म्युझियम' उभारले जात आहे, जे राज्याच्या सांस्कृतिक वारशाची ओळख जगाला करून देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

समृद्धी महामार्ग, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जेएनपीए बंदरामुळे आता राज्यातील उत्पादने काही तासांत जागतिक बाजारपेठेत पोहोचू शकतील, असे सांगत त्यांनी उद्योजकांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले.

कापसापासून बनलेल्या धाग्यांतून आपण केवळ कपडे नाही, तर विकसित भारताचे भविष्य विणत आहोत. लवकरच लंडन, न्यूयॉर्क आणि पॅरिसच्या फॅशन शोरूममध्ये 'मेड इन महाराष्ट्र'चे टॅग दिसेल, असा निर्धार उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी असोचॅमच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande